Meenakshi Shinde resigns: ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात आरोपांची सरबत्ती झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आणि ठाण्याच्या माजी महापौर, नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी दुपारी राजीनामा दिला. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी सूचना बुधवारी पत्रकार परिषदेत केली होती. विशेष म्हणजे, २४ तास उलटत नाही तोच मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला.

पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याबाबत आपले मत व्यक्त केले होते. मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे. पण, माझ्यावर गंभीर आरोप झाले तर, मी पक्षाच्या प्रमुखांना सांगेन की, आरोप सिद्ध होईपर्यंत मी पद सोडतो, अशी माझी प्रांजळ भुमीका असेन, असे सरनाईक म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की, मिनाक्षी शिंदे या आपल्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर जर आरोप होत असेल तर, त्यांनी चौकशी होईपर्यंत पक्षाचे पद बाजूला काढून ठेवले तर ते अतिशय योग्य होईल. असे माझे वैयक्तिक मत आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट होते.

अखेर प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर महिन्याभराने मीनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राजीनामा दिला आहे. त्यामध्ये समाजमाध्यमावर तसेच पक्षपातळीवर माझ्याबाबत सुरु असलेले आरोप प्रत्यारोप व सर्वपक्षीय एकत्र येऊन माझ्यावर विविध आरोप करत पक्ष नेतृत्त्वास अर्थात मुख्य नेते व पालकमंत्री म्हणून आपणास वेठीस धरण्याचे षड्यंत्र सुरु आहे. हे पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या.

मीनाक्षी शिंदे यांचा शिवसेना महिला जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा 

मी आजवर संपूर्ण निष्ठेने काम केले. पक्षाला किंवा आपणास कधीही मान खाली घालावी लागेल असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते. ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले. त्याच नेतृत्त्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे ही कल्पानाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे. म्हणूनच, मी महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाची प्रतिष्ठा आणल्या नेतृत्त्वाचा सन्मान जपण्यासाठी घेतला असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.