ठाणे : बाहेरचे उमेदवार आम्हाला लादले जात होते. पण, स्थानिकांनी जेव्हा उठाव केला त्यावेळी विरोध झाला येणारी निवडणूक ही आमच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. आपलेच आम्हाला पाडण्यासाठी खूप प्रयत्न करतील, पण प्रभागात आम्ही काम केले आहे. त्यामुळे लोक नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवतील अशी प्रतिक्रिया माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्याची उघडपणे भूमिका मांडून माजी नगरसेवक भुषण भोईर यांच्याविरोधात दंड थोपटणारे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांना शिवसेना (शिंदे गट) पक्षाने निलंबित केले होते. विक्रांत हे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या माजी महापौर आणि ठाणे महिला जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे यांचे समर्थक मानले जात असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या नाराजी नाट्याचा फायदा अखेर वायचळ यांना झाला असून भुषण यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर वायचळ यांना उमेदवारी देण्यात आली.
विक्रांत वायचळ यांच्या प्रचाराला सुरुवात करण्याआधी मिनाक्षी शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे स्मृतीस्थळावर भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाध साधला. ‘कार्यकर्त्यांना बळ देण्याच काम नेत्याचे आहे. त्यामुळे नवी दिशा उमेद घेऊन या प्रचार फेरीत उतरणार आहोत. दिघे साहेबांचा आर्शिवाद आणि त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत’, असे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.
‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती ऐकून घेतली आणि त्यानंतरच वायचळ यांना उमेदवारी दिली. यासाठी बराच संघर्ष झाला, आरोप प्रत्यारोप झाले पण कार्यकर्ता कधी घाबरत नाही. फितुर जवळ असतो आपल्याबरोबर असतात त्यावेळी संघर्षाची वाट ही खूप अडचणीत येते पण तसे फितूर असण्यापेक्षा मला वाटतं की कट्टर एक दोन बरोबर ठेवून चालणं ही मोठी जबाबदारी असते शंभरांची गर्दी जमून त्या फितूर सोबत जगण्यापेक्षा मला वाटतं दोन लोकांना घेऊन लढा देणे ही महत्त्वाची भूमिका आहे.’ असे वक्तव्य देखील त्यांनी केले.
माझ्यासारखी बाई लढूनच इथपर्यंत आली…
अपक्ष असतील, आपले असतील आणि इतर पक्षातील असतील यांची एकी झाली आहे. त्यांचं फक्त एकच लक्ष आहे की, शिवसेनेचा धनुष्यबाण त्या प्रभागात निवडून येऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत. परंतू, मला वाटतं जेव्हा लढाई होते तेव्हा जिंकणात मज्जा असते. माझ्यासारखी बाई लढूनच इथपर्यंत आली आहे, असे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.
