एमएमआरडीए आणि पालिका आयुक्तांची बैठक
ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या प्रकल्पांतील अडथळे दूर करण्यासाठी एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव आणि ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची गुरुवारी ठाण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये बाळकुम ते गायमुख खाडीकिनारा मार्ग, कळव्यातील आत्माराम चौक ते खारेगाव बाह्य़वळण मार्ग, कळवा तिसऱ्या पुलाची मार्गिका रेल्वे पुलावरून नेऊन ती पटनी भागात उतरविणे आणि मुंब्रा ते शीळ मार्गाच्या रुंदीकरण कामांतील अडथळे दूर करणे अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण आणि त्यावर सविस्तर चर्चा झाली. यापैकी खाडीकिनारी मार्ग आणि कळवा बाह्य़वळण मार्ग प्रकल्पांच्या आराखडय़ांमध्ये काहीसे बदल करून ते तातडीने सादर करण्याच्या सूचना आयुक्त राजीव यांनी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसेच या बैठकीच्या निमित्ताने ठाण्यातील विकासाला समन्वयाचा वेग आल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एमएमआरडीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प सुरू असून या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयात गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव आणि ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी मार्ग प्रकल्पाच्या आराखडय़ाचे सादरीकरण पालिका प्रशासनाने केले. याशिवाय कळव्यातील आत्माराम चौक ते खारेगाव बाह्य़वळण मार्ग आणि कळवा तिसऱ्या पुलाची मार्गिका रेल्वे पुलावरून नेऊन ती पटनी भागात उतरविणे या दोन्ही प्रकल्पांचेही या वेळी सादरीकरण झाले. बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी प्रकल्पामध्ये मोघरपाडा भागातील खारफुटी बाधित होणार असून ती कमीत कमी कशी बाधित होईल यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच गायमुख भागात मुख्य मार्गाला खाडीकिनारा मार्गिका जोडण्यात येणार असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी ग्रेड स्पेरेटर उभारल्यास ही समस्या सुटू शकते, असा दावा करत आयुक्त राजीव यांनी त्याचा आराखडय़ात समावेश करण्याची सूचना पालिकेला केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च काहीसा वाढण्याची शक्यता आहे. कळवा तिसऱ्या खाडी पुलाची मार्गिका विटावाजवळ उतरविण्यात आली आहे. मात्र त्यापुढेच चिंचोळ्या मार्गिका आहेत. त्यावर रेल्वे मार्गिका असल्याने त्यांचे रुंदीकरणही शक्य नाही. त्यामुळे या चिंचोळ्या मार्गिकेजवळ वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ही मार्गिका रेल्वे मार्गिका पुलावरून नेऊन ती पटनी मैदानजवळ उतरविण्याची मागणी केली होती. त्यास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमती दर्शवली होती. त्यानुसार पालिकेने या मार्गिकेचा आराखडा तयार केला असून त्याचेही सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. तसेच कळवा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी तयार केलेल्या कळव्यातील आत्माराम चौक ते खारेगाव बाह्य़वळण मार्गाचेही या वेळी सादरीकरण करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाचा आराखडा दोन वर्षे पूर्वीचा असल्याने नव्या दरानुसार प्रकल्प खर्च तयार करून त्याचा सविस्तर आराखडा सादर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या सर्वच प्रकल्प आणि त्याचबरोबर महापे ते काटई मार्गासाठी भूसंपादन व पर्यावरणविषयक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना आयुक्त राजीव यांनी पालिका प्रशासनाला केली. मुंब्रा ते शीळ मार्गाच्या रुंदीकरण कामात बाधित होणारी बांधकामे हटविण्याबाबत आणि मुंब्रा परिसरात पर्यायी मार्गिका उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
प्रकल्प असे आहेत..
’ कापुरबावडी येथे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी जशी मार्गिका तयार केली आहे तशाच प्रकारची नवीन मार्गिका कळवा तिसऱ्या खाडी पुलाला जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १६१.१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
’ कळव्यातील आत्माराम चौक ते खारेगाव असा ३.३५ किलोमीटर लांबीचा बाह्य़वळण मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे ३०० कोटी खर्च अपेक्षित आहे.
’ बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी मार्ग सुमारे १३ किमीचा असणार आहे. एकूण सहापदरी हा मार्ग असणार आहे. काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
