ठाणे : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील एका विद्यापीठात शिकरणाऱ्या परंतु सुट्टीनिमित्ताने नाशिक येथे आलेल्या १९ वर्षीय तरुणाचा ‘आयफोन १७ प्रो’ हा अत्यंत महागडा मोबाईल मुंबईल लोकलमधून एका चोरट्याने खेचून नेला. तरुणाला आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितल्यानंतर त्याने आसनगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनीही अत्यंत जलद कारवाई करत रस्तेमार्गाने चोराचे लोकेशन ट्रॅक करत अवघ्या तासांत तरुणाचा मोबाईल परत केला. नेमकी कारवाई कशी झाली आणि काय प्रकरण होते पाहूया..
आपला मोबाईल चोरीला गेला. तर सर्वात पहिला प्रश्न निर्माण होतो. कोणत्या पोलीस ठाण्यात जावे नंतर काही पोलिसांकडून मिळणार विचित्र वागणूक, एफआयआर दाखल करण्यास लागणारा वेळ आणि तोपर्यंत चोरटा तुमच्या मोबाईलचे वेगवेगळे पार्ट करुन ते विकून मोकळा झालेले असतो. त्यामुळे अनेकदा मोबाईल सापडत देखील नाही. असे किस्से अनेकांसोबत घडलेले पाहिले असतील. परंतु मेलबर्नमधील एका विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वेगळाच अनुभव आला. त्याला त्याचा मोबाईल फोन पोलिसांच्या तत्त्परतेने मिळाला आणि आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरात आई-वडिलांसोबत वास्तव्यास असलेला १९ वर्षीय मुलगा हा मेलबर्न येथील एका विद्यापीठात आयटी अभियंता या विषयाचे शिक्षण घेत आहे. पहिल्या वर्षाचे शिक्षण पूर्ण झाल्याने तो सुट्टी निमित्ताने ११ फेब्रुवारीला नाशिक येथे त्याच्या घरी आला होता. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालविल्यानंतर २३ फेब्रुवारीला पुन्हा मेलबर्न येथे जाण्यासाठी निघाला होता. रात्री तो मित्रांसोबत दुचाकीने कसारा रेल्वे स्थानकात आला. त्यानंतर त्याने कसारा स्थानकातून घाटकोपर येथे जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. रेल्वेगाडी उंबरमाळी स्थानकात आली. त्यावेळी तरुण त्याच्या मोबाईलमध्ये पाहत होता. रेल्वेगाडी काही सेंकद स्थानकात थांबली आणि पुन्हा सुरु झाली असता, त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल खेचून स्थानकात उतरुन पळून गेला.
तरुणाने तात्काळ प्रसंगावधान राखत रेल्वेगाडीची साखळी ओढली. रेल्वेगाडी थांबल्यानंतर तरुणाने त्याचा शोध घेण्यास सुुरुवात केली. परंतु तो आढळून आला नाही. त्यामुळे तरुणाने स्थानकातील स्थानक व्यवस्थापकांचे कार्यालय गाठले. त्यांना त्याला तात्काळ आसनगाव रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यास सांगितली. तरुणाने त्याच्या मित्रांना संपर्क साधला आणि त्यांना उंबरमाळी स्थानकाजवळ बोलावले. तेथून त्यांनी आसनगाव रेल्वे पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात पोहचे पर्यंत मध्यरात्रीचे १ वाजले होते.
पोलिसांची तत्परता
मध्यरात्री तरुण आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्राच्या मोबाईलमध्ये तरुणाच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते लोकेशन मुंबई-आग्रा रोड मार्गावर दाखविले जात होते. पोलिसांनी तरुण आणि त्याच्या मित्रांना घेऊन वाहनाने त्या लोकेशनच्या मदतीने पाठलाग सुरु केला. आता त्या मोबाईलचे लोकेशन एका वाहनात दाखवित होते. पोलिसांनी ती गाडी थांबविली. त्यावेळी त्या तरुणाचा मोबाईल एका व्यक्तीकडे आढळून आला. पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सलीम तांबोळी (४५) असे सांगितले. तो पुण्यातील रहिवासी असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरोधात आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

