डोंबिवली- शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी डोंबिवलीत प्रगती महाविद्यालयात स्मृती समिती पदाधिकाऱ्यांची बैठक आज (शनिवार) आयोजित केली होती. या बैठकीत भाजपा नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी २०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, मोदी सरकारच निवडून येणार आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही कमी मतदान होईल, असे विधान केले.

मोदींच्या विजयाचा उल्लेख होताच, बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेस प्रदेश नेते संतोष केणे यांचा पारा चढला आणि त्यांनी बैठक कसली आणि विधान कसली करता, असा प्रश्न उपस्थित करून आसन सोडले. यावेळी बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ सभेत गोंधळ निर्माण झाला. इतर नेत्यांनी केणे यांना शांत करून त्यांची मनधरणी करून पुन्हा आसनस्थ केले.

आपण दि. बा. पाटील यांच्या स्मृती दिन बैठकीसाठी जमलो आहोत. बैठकीत सामाजिक आणि स्मृती दिन विषयावर चर्चा करण्याऐवजी भाजप नेते जगन्नाथ पाटील यांनी राजकारण आणण्याची गरज नव्हती. कोण निवडून येईल, कोण कोणाला मतदान करेल, हे लोक ठरवतील, अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेश नेते संतोष केणे यांनी दिली.

भाजप नेते पाटील यांनी नंतर शांततेची भूमिका घेऊन या विषयावर पडदा टाकला. या बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, भाजप नेते जगन्नाथ पाटील, संघर्ष समितीचे गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, शरद पाटील उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात नोटीस पाठवून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीच्या विरोधात देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. एकीकडे काँग्रेस कार्यकर्ते केंद्र सरकारकडून चौकशी यंत्रणांच्या गैरवापर केला जात असल्याचे म्हणत आक्रमक झाले आहेत. त्याचवेळी भाजपा स्थानिक नेते मोदी यांचे गौरवगान गात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे.

२४ जून रोजी दि. बा. पाटील यांच्या स्मृती दिन कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सर्व पक्षीय संघटना पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, ज्ञाती बांधव यांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले.