१०० मीटर रुंद रस्तेही अपुरे पडतील!

मुंबई महानगर क्षेत्राचे झपाटय़ाने नागरीकरण होत असताना येथील लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडू लागली आहे.

‘एमएमआरडीए’च्या सर्वंकष परिवहन अभ्यासातील निरीक्षण;  वाढत्या खासगी वाहतुकीकडे बोट

जयेश सामंत, सागर  नरेकर

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्राचे झपाटय़ाने नागरीकरण होत असताना येथील लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. त्यातच खासगी वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत सार्वजनिक वाहतूक साधनांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या १३ टक्क्यांनी घटल्याचे निरीक्षण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केलेल्या परिवहन अभ्यासात नोंदवण्यात आले आहे. खासगी वाहतुकीचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास येत्या काळात ५० ते १०० मीटर रुंद रस्तेही अपुरे पडू लागतील, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या झपाटय़ाने वाढली आहे. जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, दिवा, शिळ, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, आसनगाव आणि शहापूर भागात मोठय़ा प्रमाणावर नागरिकीकरण होते आहे. मुंबई उपनगरे, ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईच्या वाढत्या क्षेत्रातील वाढीव लोकसंख्या वाहतूक आणि दळणवळणासाठी रेल्वे सेवा आणि स्थानिक महापालिकांच्या परिवहन सेवेवर अवलंबून आहे. मात्र या सेवेवरचा भारही झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे लोकल आणि परिवहन उपक्रमांच्या बस आज तुडुंब भरून धावताना दिसत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी अनेक नागरिक खासगी वाहनाने प्रवास करू लागल्याची बाब एमएमआरडीएच्या परिवहन अभ्यासात नोंदवण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या या अहवालानुसार गेल्या दहा वर्षांमध्ये रेल्वे आणि बसआधारित जलद वाहतुकीची टक्केवारी ७८ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे. 

सध्या सुरू असलेल्या नागरिकीकरणाचा वेग असाच कायम राहिल्यास भविष्यात रस्ते कायमच कोंडीत राहतील अशी शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात वाहतुकीची वाढलेली मागणी प्रचंड असून भविष्यात ५० आणि १०० मीटरचे रस्तेही अपुरे पडू शकतात, अशी शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

नवीन प्रकल्पही अपुरे?

मुंबई महानगर क्षेत्रातील खासगी वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे एमएमआरडीएच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रवाशांचा वाढता भार लक्षात घेता महानगर क्षेत्रात वाहतूक सुविधांचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आखले जात असले तरी खासगी वाहनांची संख्या अशीच वाढत राहिली तर या प्रकल्पांच्या मर्यादा दिसून येतील अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या जटिल होत चालल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Meter wide roads enough ysh

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार
ताज्या बातम्या