मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘मेट्रो ५ ब’ मार्गिकेअंतर्गत ‘मेट्रो ५’चा विस्तार खडकपाडा – उल्हासनगर असा करण्यात येणार असून यासंबंधीचा सविस्तर आराखडा राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. ‘शिवाजी चौक – विरार मेट्रो १३’ मार्गिकेच्या आराखड्याचा प्रस्तावही लालफितीत अडकला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या मान्यतेची एमएमआरडीएला प्रतीक्षा आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील १४ मेट्रो प्रकल्पांतील ‘मेट्रो ५’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे काम सध्या एमएमआरडीएकडून सुरू आहे. २४.९ किमी लांबीच्या या मार्गिकेचा विस्तार आता उल्हासनगरपर्यंत करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार खडकपाडा – उल्हासनगर अशा ७.७ किमी लांबीच्या ‘मेट्रो ५ ब’ मार्गिकेचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे.

आराखड्याच्या प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव पाठवून एक ते दीड वर्षे झाली तरी या प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी लांबणीवर पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच वेळी मुंबई महानगर प्रदेशातील आणखी एक महत्त्वाच्या मार्गिकेचेही काम लांबणीवर पडले आहे. ही मार्गिका म्हणजे ‘मेट्रो १३’ मार्गिका. शिवाजी चौक – विरार अशा २३ किमी लांबीच्या ‘मेट्रो १३’ मार्गिकेचाही सविस्तर आराखडा एमएमआरडीएने तयार केला आहे. हा आराखडाही मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

एमएमआरडीएकडून सध्या सहा-सात मार्गिकांची कामे सुरू आहेत. तर ‘मेट्रो १३’ अद्यापही कागदावर आहे. नवीन वर्षात उर्वरित मार्गिकांच्या कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएचे आहे, पण ‘मेट्रो १३’ आणि ‘मेट्रो ५ ब’चा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. आराखड्याला मान्यता मिळाली तरच या वर्षात निविदा प्रक्रिया, भूसंपादन पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवता करता येणार आहे. ‘मेट्रो १३’ मार्गिकेसाठी भूसंपादन करावे लागणार असून हे भूसंपादनही रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता ‘मेट्रो ५ ब’ आणि ‘मेट्रो १३’ मार्गिकांच्या आराखड्याच्या मान्यतेसह ‘मेट्रो १३’ मार्गिकेच्या भूसंपादनासाठी एमएमआरडीएला पाठपुरावा करावा लागणार आहे.