ठाणे : वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड येथे शनिवार दुपारी मेट्रोच्या खांबाचा काँक्रीट स्लॅब (पॅरापेट) उंचावरून खाली कोसळून एकाचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर मेट्रो कामे सुरू असलेल्या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून यापुर्वी ठाणे, घोडबंदर आणि भिवंडीतील मार्गांवर मेट्रो कामादरम्यान अपघात घडले आहेत. यामुळे मुंलूंडच्या अपघातानंतर ठाणे, घोडबंदर आणि भिवंडीत मेट्रोच्या कामामुळे चालकांसह नागरिकांचा प्रवास धोकादायकरित्या सुरु असल्याचे चित्र आहे.

रस्ते आणि रेल्वे मार्गावरील भार कमी व्हावा तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून मुंबई महानगर परिसरात मेट्रो प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे, घोडबंदर तसेच भिवंडी शहरात मेट्रो मार्गिका आणि स्थानके उभारणीची कामे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, या कामादरम्यान, सुरक्षितेतच्या नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रकार घडत आहेत.

सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक करीत असतानाही मेट्रोची कामे केली जात असून या कामादरम्यान, वाहतूक कोंडी होतेच पण, त्याचबरोबर जीवघेणे अपघातही घडू लागल्याने या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ मार्गिकेचे काम सुरू असून ही कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) सुरू आहेत. या कामादरम्यान मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसमोरील एल.बी.एस. रोडवर शनिवार दुपारी १२.२० च्या सुमारास मेट्रोच्या खांबाचा काँक्रीट स्लॅब कोसळला.

रस्त्यावरून जात असलेली रिक्षा आणि मोटारीगाडीवर हा भाग कोसळला असून यात एकाचा जागीच मृत्य झाला तर, तिघे जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर ठाणे, घोडबंदर आणि भिवंडीत मेट्रोच्या कामामुळे चालकांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

यापुर्वी घडलेले अपघात

घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी भागात सप्टेंबर २०२५ मध्ये दोन लोखंडी राॅड कारवर पडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मेट्रोच्या कामासाठी उन्नत मार्गावर ठेवलेले हे दोन राॅड वाहनावर पडले होते. हे राॅड कारच्या आरशावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच कापूरबावडी भागात यापूर्वी अशा दोन घटना उघडकीस आल्या होत्या.

३० जुलैला तत्वज्ञान विद्यापीठ भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकाच्या कारवर राॅड पडला. या घटनेत चालक थोडक्यात बचावला होता. २ मे या दिवशी एका कारवर मेट्रो कामासाठी बसविण्यात आलेल्या क्रेनचा भाग कोसळला. या घटनेतही चालक आणि त्याचे कुटुंबिय बचावले होते. भिवंडी येथेही ५ ऑगस्टला सोनू अली रमजान अली शेख (२२) या तरुणाच्या डोक्यात प्रवासा दरम्यान मेट्रो मार्गिकेसाठी लागणारी सळई डोक्यात शिरली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याचे चित्र आहे.