ठाणे : वडाळा ते कासारवडवली या ‘मेट्रो मार्ग ४’च्या प्रकल्पाच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून गरज नसलेल्या भागातील मार्गरोधक काढण्याच्या तसेच पावसाळय़ापूर्वी रस्त्यालगतचा राडारोडा बाजूला करून साफसफाई करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बुधवारी पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. तसेच ठरवून दिलेल्या वेळेत मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असून या कामाची नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यांनी मॉडेल चेकनाका येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. या भागात मेट्रोचे काम किती टक्के पूर्ण झाले आहे, याचा आढावा घेत उर्वरित कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी दिले. या मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंतची मुदत आहे. या मुदतीत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये मेट्रोचे जाळे तयार करण्याचे काम सुरू असून या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यानंतर रस्त्यांवर वाहनांचा भार कमी होऊन कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच रस्त्यांबरोबर रेल्वे वाहतुकीवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार असून त्याचबरोबर त्यांची कोंडीतून सुटका होईल, असेही शिंदे यांनी सांगितले. मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका भागात विद्युत कामासाठी मोठा खड्डा खोदला असून यामुळे अपघाताची शक्यता आहे. गुरुवारी शिंदे यांचा दौरा या मार्गावरून जात असताना त्यांनी खड्डय़ांच्या परिसरात वाहन थांबवून तातडीने खड्डा बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.