डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील निळजे लोढा हेवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निळजे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर कोळसेवाडी वाहतूक विभागाची ना हरकत प्रमाणपत्र न घेता, परस्पर खोदकाम करून शासकीय नियमाचे उल्लंघन आणि वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याबद्दल कोळसेवाडी वाहतूक विभागाने महानगर गॅस वाहिन्या टाकणाऱ्या ठेकेदारावर मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.२२) गुन्हा दाखल केला आहे.
कोळसेवाडी वाहतूक विभागाचे हवालदार देविदास वाघरे यांच्या तक्रारीवरून महानगर गॅस लिमिटेडचे भूमिगत गॅस वाहिका टाकणारे ठेकेदार राजेशकुमार पांडे यांच्या विरूध्द हा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला आहे. हवालदार वाघेरे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की डिसेंबर २०२५ मध्ये लोढा हेवन परिसरातील रहिवासी रवी सिंह यांनी लोढा हेवन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निळजे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर ठेकेदाराने खोदून ठेवले आहे. यामुळे नागरिक, वाहनांना प्रवास करण्यास त्रास होत आहे, अशी तक्रार शासनाच्या आपले सरकार संकेतस्थळावर केली होती.
या तक्रारीची शासनाकडून दखल घेऊन ही तक्रार पडताळणी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी कल्याणमधील कोळसेवाडी वाहतूक विभागाकडे आली होती. वाहतूक विभागाचे तत्कालीन (सेवानिवृत्त) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, हवालदार देविदास वाघेरे यांनी लोढा हेवन भागातील निळजे रेल्वे स्थानक मार्गावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी प्राप्त तक्रारीप्रमाणे सार्वजनिक रस्त्यावर खोदुन ठेवण्यात आले होते. हे खोदकाम महानगर गॅस लिमिटेडच्या राजेशकुमार पांडे या ठेकेदाराने केले असल्याचे तपासणीत वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले.
हे खोदकाम करताना शासनाच्या आवश्यक परवानग्या संबंधित कंपनी आणि ठेकेदाराने घेणे बंधनकारक असते. वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी ठेकेदार पांडे यांच्याकडे रस्ते खोदकामाच्या आवश्यक परवानग्या मागितल्या. त्यामध्ये ठेकेदाराने कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेतल्याचे दिसून आले. या परवानगीत वाहतूक विभाग उपायुक्तांची परवानगी महत्वाची होती. ही परवानगी ठेकेदाराकडे मागितली असता, ती दाखवण्यास त्याने असमर्थता दर्शवली. आणि वाहतूक विभागाची रस्ते खोदकामासाठी परवानगी घेतली नाही, असे अधिकाऱ्यांना सांगितले.
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणच्या वर्दळीच्या निळजे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करून शासकीय नियम अटींंचे उल्लंघन केले म्हणून वाहतूक विभागाचे हवालदार देविदास वाघेरे यांनी चौकशी अंती महानगर गॅसचे ठेकेदार पांडे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गु्न्हा दाखल केला आहे.
