ठाणे : पुरंदर येथील नवे विमानतळ आणि उद्योग वाढीसाठी राज्यभरात नव्या जमिनीच्या संपादनासाठी ‘हुडको’कडून दहा हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या तयारीत असलेल्या महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीचे नवे धोरण आखले आहे.
२०२५ ते २०२६ या आर्थिक वर्षात एमआयडीसीने ८५६३ कोटी ८३ लाख इतका मोठा निधी खासगी आणि सहकारी बँकांमध्ये गुंतविला होता. यापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक निधीची गुंतवणूक तीन मोठया खासगी बॅकांमध्ये करण्यात आली होती. गुंतवणुकीच्या या धोरणात मोठे बदल करताना यापुढे जास्तीत जास्त ५० टक्के इतकाच निधी यापुढे खासगी बॅकांमध्ये गुंतवण्याचे धोरण एमआयडीसी प्रशासनाने तयार केले आहे.
महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाचा नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात १३ हजार कोटी रुपयांची मोठी तूट दिसत असली तरी एमआयडीसीकडे अतिरीक्त निधीची वानवा नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षात एमआयडीसीच्या अर्थसंकल्पात राज्यभरात नव्या जमिनीचे संपादन तसेच पुरंदर येथील नव्या विमानतळासाठी ४०० टक्क्यांपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही तुट वाढली असली तरी एमआयडीसीवर असलेले दायित्वही मोठे आहे. अतिरीक्त निधीच्या गुंतवणुकीतून येणाऱ्या व्याजातून हे दायित्व कमी करण्याकडे एमआयडीसीचा कल असला तरी यावर्षी गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवण्याऐवजी सावध आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी प्रशासनाने सुरू केली आहे.
सध्याची गुंतवणुक कुठे आणि कशी?
गेल्या आर्थिक वर्षात एमआयडीसीच्या वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण ८ हजार ५६३ कोटी ८३ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. यापैकी इंडसइंड बॅक (२१५० कोटी), बंधन बॅक (३५६१ कोटी), एयु स्मॅाल फायनान्स बँक (२४१५ कोटी) अशा तीन प्रमुख खासगी बँकांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय कॅनरा बँक (२७२ कोटी), आयडीबीआय बँक (११० कोटी), फेडरल बँक (३० कोटी) आणि टीजेएसबी बँक ( २५ कोटी) अशा प्रकारे इतक बँकांमध्ये ठेवी गुंतवण्यात आल्या आहेत.
खासगी आणि सहकारी बँकांमधील या गुंतवणुकीतून गेल्या तीन वर्षात एमआयडीसीला २०६२ कोटी ६९ लाख इतका व्याज परतावा मिळाला आहे. असे असले तरी गुंतवणुकीची रचना अधिकाधिक खासगी आणि सहकारी बँकांवर आधारित आहे. याशिवाय एका बॅकेत नेमका किती निधी गुंतवला जावा याविषयी एमआयडीसीचे ठोस असे धोरण आतापर्यंत ठरलेले नाही. त्यामुळे जवळपास ९० टक्के निधी तीन खासगी बँकांमध्ये गुंतवण्यात आला आहे.
राष्ट्रीयकृत बँकांबरोबर १६ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिकचे नक्त मूल्य (नेट वर्थ) असणार्या बँकेतच या निधी गुंतवण्यात याव्यात असे ठरविण्यात आले होते.
नवे धोरण नेमके काय आहे ?
एमआयडीसीने आखलेल्या नव्या धोरणानुसार अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीसाठी सिडकोच्या धर्तीवर केवळ ५० टक्के इतकाच निधी खासगी बँकांमध्ये गुंतवण्याचे ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र गृह निर्माण तसेच क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के रक्कम वाणिज्य बँका आणि महाराष्ट्र सहकारी बँकेकडे गुंतवण्याचे धोरण आखले आहे.
खासगी बॅकांचे ठेवींवरीज व्याज दर राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा अधिक असले तरी एमआयडीसीच्या नव्या धोरणाप्रमाणे एकूण ५० टक्के इतकाच अतिरिक्त निधी यापुढे खासगी बँकांमध्ये गुंतवण्याचे ठरविण्यात आले आहे. अतिरिक्त निधीच्या एकूण रकमेपैकी १५ टक्के निधीची गुंतवणूक एका खासगी बँकेत तसेच जास्तीत जास्त ५० टक्के निधी खासगी बँकांमध्ये गुंतवण्याचे धोरण आखण्यात आले आहे.
जर एमआयडीसीकडे १० हजार कोटी इतका अतिरीक्त निधी असेल तर नव्या धोरणानुसार एका खासगी बँकेत १५०० कोटीपर्यंत आणि इतर सर्व खासगी बँकांमध्ये पाच हजार कोटींपर्यतची गुंतवणूक केली जाईल. उर्वरित पाच हजार कोटी इतर सरकारी बँकांमध्ये गुंतवणूक करण्याचे धोरण एमआयडीसीने राज्य सरकारकडे मंजूरीसाठी पाठविले आहे. या गुंतवणुकीसाठी कार्यकारी गटाची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामध्ये मुख्य लेखा अधिकारी, सह मुख्य लेखा अधिकारी, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक यांची समिती असणार आहे.
