कल्याण – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील व बारवी धरणातून बाहेर पडणाऱ्या मुख्य गुरुत्ववाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम एमआयडीसीकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून गुरुवारी (ता. २४) रात्री १२ ते शुक्रवार (ता. २५) रात्री असा बारा तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे बारवी धरणातून आणि जांभुळ जलशुध्दीकरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण डोंबिवली महापालिका परिसर, उल्हासनगर महानगरपालिका आणि लगतची गावे, २७ गावांसह लगतच्या वसाहतींचा पाणी पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी अगोदर एक दिवस पुरेल इतका पुरेसा पाणी साठा घरात करून ठेवावा. दुसऱ्या दिवशीही कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने निवासी वसाहती, औद्योगिक वसाहीत, गृहसंकुलातील रहिवाशांनी पुरेशा पाण्याचे नियोजन करून ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

बारवी धरणातून दररोज ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, तळोजा शहरे, लगतच्या ग्रामपंचायती, नवीन गृहसंकुले, औद्योगिक वसाहतींना ९५० ते एक हजार दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठा बंदचा औद्योगिक वसाहतींचा फटका बसणार आहे. पावसाळ्याच्या काळात जलवाहिन्या, जलशुध्दीकरण कामांचे देखभाल दुरुस्तीचे काम करताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची करावयाची कामांचा भाग म्हणून हे काम हाती घेण्यात आले आहे, असे औद्योगिक विकास महामंड़ळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

गुरुवारी, शुक्रवारी एमआयडीसीकडून पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने अनेक उद्योजकांनी आपल्या कंपनीत माल उत्पादनासाठी पुरेसा पाणी साठा राहील यासाठी खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी विकत घेऊन कंपनीत पुरेशा प्रमाणात पाणी साठा राहील याची काळजी घेतली आहे. निवासी संकुलांनीही खासगी टँकर पाणी पुरवठा चालकांकडे दोन दिवस पाणी पुरवठ्याची नोंदणी करून ठेवली असल्याचे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य गुरुत्व वाहिन्यांवरील गळती लागलेले व्हाॅल्व्ह, जलवाहिन्यांमधील गळतीची ठिकाणे निश्चित करून ती या कालावधीत सुस्थितीत केली जातात. वर्षभरात चार ते पाच वेळा काटई, बदलापूर, शिळपाटा रस्त्यावरील जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडतात.