पूरग्रस्त भागांत पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू


ठाणे : पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर परिसराला पुराचा फटका बसल्याने गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर क्षेत्रात विस्कळीत झालेला दुधाचा पुरवठा मागील २४ तासांपासून सुरळीत होऊ लागला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत दररोज होणाऱ्या गोकूळ आणि वारणा दूध पुरवठ्यात ७० टक्के कपात झाली होती. पावसाचे पाणी ओसरू लागल्याने रस्ते वाहतूक सुरळीत झाल्याने बुधवारपासून दुधाचा पुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत गोकुळ, वारणा दुधाचा पुरवठा करण्यात येतो. महानगर क्षेत्रातील प्रमुख शहरांमध्ये गोकूळ दुधाचा सात लाख लिटर तर वारणा दुधाचा तीन लाख लिटर पुरवठा होतो. त्यापैकी ठाणे शहराला एक लाख लिटर गोकूळ आणि ५० हजार लिटर वारणा दुधाचा पुरवठा होतो. अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाल्याने दुधाचा पुरवठा ठप्प झाला होता. त्याचबरोबर वाहतूकही विस्कळीत झाली होती. परिणामी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत होणाऱ्या गोकूळ तसेच वारणा दुधाच्या पुरवठ्यात ७० टक्के कपात झाली. ठाणे जिल्ह्यांमध्ये गोकुळ दुधाचे एकूण दहा ते बारा लाख तर एक लाख वारणा दुधाचे ग्राहक आहेत, अशी माहिती दूध वितरण विक्रेता संघाचे सदस्य कृष्णा पाटील यांनी दिली. दूध पुरवठ्यात कपात झाल्याने या ग्राहकांना इतर डेअरीचे दूध द्यावे लागत होते. आता काही प्रमाणात पावसाचे पाणी ओसरू लागल्याने रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले. त्यामुळे दुधाचा पुरवठाही सुरळीत झाला आहे. मंगळवारी ५० टक्के दुधाचा पुरवठा झाला तर, बुधवारी १०० टक्के दुधाचा पुरवठा झाला असल्याची माहिती काही दूध वितरकांकडून देण्यात आली.

३० टक्के पुरवठा

कोल्हापूरमधून दुधाचे टँकर वाशीमध्ये येतात. या ठिकाणी गोकुळ आणि वारणा दुधाची पॅकिंग केली जाते. त्यानंतर ग्राहकांच्या संख्येनुसार या दुधाचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत पुरवठा करण्यात येतो. यावेळी वाशीतही काही प्रमाणात दुधाचा साठा केला जातो. कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली आणि दुधाचे उत्पादन पूर्ण ठप्प झाले. तेव्हा वाशीत असलेल्या दुधाच्या साठ्यातून दरदरोज ३० टक्के पुरवठा या जिल्ह्यांना करण्यात येत होता.