Sahar Shaikh : ठाणे महापालिकेत एमआयएमच्या ५ उमेदवारांचा विजय झाला आहे. यापैकी सहर शेख या तरुण नगरसेविकेचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये त्या स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचत आहेत. तर, संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची मनीषा व्यक्त करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विधानाचे अनेकविध अर्थ लावले जात आहेत. मात्र, त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमचे उमेदवार नफिस अन्सारी, सहार युनूस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरीद हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर सहार युनूस शेख यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात त्या म्हणाली आहे की, पुढच्या निवडणूकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवे करून टाकू. मुंब्य्रातून विरोधकांना पळवून लावूया. पुढच्या निवडणुकीत मुंब्य्रात निवडून येणारा प्रत्येक उमेदवार हा एमआयएमचा असेल.”
माझ्या झेंड्याचा रंग भगवा असता तर…
सहार शेख यांच्या या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विधानाची चर्चा झाली. मात्र, आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, “माझ्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे. त्यामुळे मुंब्य्राला हिरव्या रंगात रंगवेन असं म्हटलं.. जर माझ्या झेंड्याचा रंग भगवा असता तर भगव्या रंगात रंगवेन असं म्हणाले असते.”
“मी व्यवस्थित प्रचार कॅम्पेन केलं, ते कॅम्पेन प्रत्यक्षात उतरवलं”, असं त्या म्हणाल्या. तसंच, मी फक्त माझ्या प्रभागापुरता प्रचार केला त्यामुळे फक्त चारच नगरसेवक निवडून आले. मी पूर्ण मुंब्र्यात प्रचार केला असता तर संपूर्ण मुंब्र्यात एमआयएमचे उमेदवार निवडून आले असते”, असंही त्या पुढे म्हणाल्या. तसंच, जितेंद्र आव्हाड यांनी शब्द देऊनही त्यांनी उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार होतो, परंतु, एबी फॉर्म भरताना एमआयएमने आम्हाला त्यांचा एबी फॉर्म दिला, त्यामुळे मी त्यांच्या पक्षातून निवडणूक लढवली. त्यामुळे आम्हाला ताकद मिळाली”, असंही त्या म्हणाल्या.
