मंत्री रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवलीत जल्लोषात स्वागत

विकास कामे आणि नागरी समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवलीत जल्लोषात स्वागत
घरडा सर्कल येथे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

डोंबिवली- कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचे मंगळवारी रात्री डोंबिवलीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे भाजपकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. विकास कामे आणि नागरी समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

घरडा सर्कल येथे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. तेथून ते मिरवणुकीने गणेश मंदिराकडे आले. टिळक रस्त्यावर लो. टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मंत्री चव्हाण फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिरात आले. तेथे त्यांनी गणेशाचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानतर्फे चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. फडके रस्त्यावर जमलेल्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ढोल ताशा, वाजंत्री यांच्या गजरात नृत्य करत चव्हाण यांचे स्वागत केले. गुलालाची उधळण करण्यात येत असल्याने रस्ते लालभडक झाले होते. यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने पावसात भिजत कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत होते. या आनंदोत्सवात डोंबिवलीतील नागरिक, व्यापारी, उद्योजक सहभागी झाले होते. मंत्री चव्हाण यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश गायकवाड, पूनम पाटील, सुहासिनी राणे, दिनेश जाधव, राजश्री पाजनकर, मितेश पेणकर, मिहिर देसाई, हरीष जावकर, मुकुंद पेडणेकर, वर्षा परमार कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डोंबिवलीत भूखंडावर कचरा टाकणाऱ्या टेम्पो चालकाला दंड
फोटो गॅलरी