चार महिन्यांत ११३ घटना; गेल्या वर्षी ३३६ घटना

वसई-विरार शहरांतून अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अल्पवयीन मुले-मुली जर बेपत्ता झाले असतील, तर या प्रकरणांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करावेत, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहे. यानुसार २०१५मध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या ३३६ घटना घडल्या आहेत, तर २०१४च्या तुलनेत हे प्रमाण खूपच अधिक आहे. या वर्षांतही चार महिन्यांमध्ये ११३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्हय़ांची नोंद आहे. या बेपत्ता मुलींचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.

सध्या पालक आणि पोलिसांना एक मोठी समस्या भेडसावत आहे तीे म्हणजे अल्पवयीन मुलामुलींच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना. २०१५ पासून या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. त्यात मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. या घटनांमध्ये केवळ बेपत्ता अशी नोंद न करता अपहरणाचा गुन्हा दाखल करून स्वतंत्र तपास सुरू होतो; परंतु वाढत्या घटनांमुळे पोलिसांचा व्याप वाढला आहे. २०१२ आणि २०१३ या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे वाढते प्रमाण दोन वर्षांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या केवळ २६ घटनांची नोंद होती. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन ८४ घटना नोंदविल्या गेल्या; परंतु २०१५ मध्ये मात्र तब्बल ३३६ घटनांची नोंद झाली. म्हणजेच दररोज सुमारे एक तरी अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी शहरातून बेपत्ता होत असतो. हे प्रमाण २०१४ च्या तुलनेत तब्बल २९६ टक्के अधिक आहे. चालू वर्षांत म्हणजे २०१६ मध्ये शहरातून ११३ मुली बेपत्ता झाल्या आहेत.

सर्वाधिक प्रमाण नालासोपाऱ्यात

अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण नालासोपारा पूर्वेच्या झोपडपट्टी तसेच चाळींच्या वसाहतींमध्ये आहे. श्रमिक वर्ग येथे राहत असतो. आई-वडील दोघे कामानिमित्त बाहेर असतात. त्यामुळे मुलांवर लक्ष देणे जमत नाही. मुली क्षणिक आकर्षणाला प्रेम मानून भुलतात आणि घरातून पळून जातात. ही मुले मुलींना दुसऱ्या शहरात नेतात. पोलीस त्यांना शोधेपर्यंत उशीर झालेला असतो. अनेकदा अपप्रवृत्तीच्या हाती लागल्याने या मुलींना अनैतिक व्यवसायात ढकलले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अल्पवयीन मुला-मुलींचे बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. अनेकदा मुली प्रेमसंबंधातून पळून जातात, मुलेही क्षुल्लक कारणावरून घर सोडून जातात. त्यासाठी मनुष्यबळ खर्ची होते, पोलीस यंत्रणेचा वेळ वाया जातो. यासाठी पालकांना पाल्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जाते. मुलगी अल्पवयीन असते, पण मुलगा सज्ञान असतो. त्यामुळे त्याच्यावर अपहरणाचा किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. तो मुलगा गुन्हेगार प्रवृत्तीचा नसला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो.

– प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज

अपहरणाच्या वसई-विरारमधील घटना

२०१२       २६

२०१३       २६

२०१४       ८४

२०१५       ३३६

२०१६       ११३