Premium

Video: लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले; मीरारोडमधील घटनेवर सुप्रिया सुळेंचं संतप्त ट्वीट!

मीरा भाईंदरमध्ये ५६ वर्षीय व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची हत्या करून आधी मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले!

meera bhayandar murder case
मीरा भाइंदरमधील हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं संतप्त ट्वीट! (फोटो – एएनआय)

मीरारोड परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि नंतर बादलीत ठेवल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखंच हेही प्रकरण असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त ट्वीट केलं आहे. याबाबत त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्लाही दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

ही घटना मीरारोडच्या गीता नगर भागात घडली. गीतानगरच्या दीप इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर हे जोडपं राहात होतं. ५६ वर्षीय मनोज साने आणि ३२ वर्षीय सरस्वती वैद्य हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून इथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. बुधवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी यायला लागल्यावर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घराचं कुलूप तोडल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

पोलिसांना दिसलं धक्कादायक दृश्य!

पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांना धक्कादायक दृश्य दिसलं. आधी त्यांना मृत महिलेचे पाय दिसले. पुढे घरातच एका बादलीत आणि पातेल्यात धड आणि शीर कापून ठेवल्याचं आढळून आलं. महिलेच्या शरीराचे विद्युत कटरच्या सहाय्याने आरोपीने तुकडे करून ते आधी कुकरमध्ये शिजवले आणि नंतर गॅसवर भाजल्याचं पोलिसांना आढळलं. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी मनोज सानेनं हे तुकडे पातेल्यात आणि बादलीत लपवून ठेवले होते. पाच दिवसांपूर्वी सरस्वती वैद्य हिची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

सुप्रिया सुळेंचं संतप्त ट्वीट!

दरम्यान, या घटनेवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणावर संताप व्यक्त करतानाच देवेंद्र फडणवीसांनी खात्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. “मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे”, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे”, अशी मागणीही त्यांनी ट्वीटमधून केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर दिल्लीतील आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरच्या केलेल्या हत्येच्या प्रकरणाचीही पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 10:28 IST
Next Story
Mira Road Murder: “मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले आणि…”, मीरा रोडमधील महिलेच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर