शहापूर : विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेली मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड, डोंगरांचे सपाटीकरण आणि वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटाविरोधात शहापुरातील नागरिक रविवारी एकवटले. पर्यावरण संरक्षण मंचच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी शहरात मानवी साखळी उभारून पर्यावरण संवर्धनाचा जोरदार संदेश दिला. यावेळी वृक्षसंवर्धन, जलसंधारण आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी करत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पर्यावरण संरक्षण मंचच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत मानवी साखळी उभारण्यात आली. पर्यावरण संरक्षणाच्या समर्थनार्थ हातात फलक घेऊन नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी “झाडे लावा, जीवन वाचवा”, “पाणी आडवा, पाणी जिरवा” आणि “जंगलतोड थांबवा” अशा घोषणा देण्यात आल्या.
शहापूर तालुका एकेकाळी घनदाट वनराई, समृद्ध जलसंपदा आणि आल्हाददायक हवामानासाठी ओळखला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांत विविध विकास प्रकल्पांमुळे येथील पर्यावरणीय समतोल ढासळत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण, मध्य रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, समृद्धी महामार्ग तसेच इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. अनेक ठिकाणी डोंगरांचे सपाटीकरण झाल्याने नैसर्गिक अधिवासांवरही परिणाम झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या बदलांचा थेट परिणाम स्थानिक हवामानावर होत असल्याचे चित्र यंदाच्या उन्हाळ्यात दिसून आले. तालुक्यातील तापमानाने तब्बल ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. वाढत्या तापमानाचा फटका केवळ मानवांनाच नव्हे, तर वन्यजीव, पक्षी आणि इतर सजीवांनाही बसत असल्याने पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे सहभागी नागरिकांनी सांगितले.
यावेळी नागरिकांनी वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची मागणी केली. तसेच पर्यावरण संरक्षण मंचचे संतोष शिंदे यांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धनाचा हा लढा केवळ एका दिवसापुरता किंवा आंदोलनापुरता मर्यादित नाही. भावी पिढ्यांना सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी हा जनआंदोलनाचा प्रारंभ आहे. प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन वृक्षारोपण, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. मानवी साखळीच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखणे ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.
