मीरा-भाईंदर शहराचे भाईंदर पश्चिम, भाईंदर पूर्व, मीरा रोड, गोल्डन नेस्ट ते हटकेश आणि महामार्ग परिसर असे ढोबळमानाने पाच विभाग होतात. मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या परिसरांचा घेतलेला कानोसा.

भाईंदर पश्चिमेकडील मूळचे गाव, नव्याने विकसित झालेला शहरीकरणाचा परिसर, मुर्धा ते थेट उत्तन हा ग्रामीण परिसर असा मिश्र वस्तीचा हा परिसर. भाईंदर हे मूळचे छोटेसे गाव असले तरी गेल्या तीस वर्षांत त्याचा कायापालट झाला आहे. त्यामुळे गावाचे स्वरूप नाहीसे होऊन शहरीकरण झाले आहे. गावचा परिसर सोडून उर्वरित शेतीच्या जमीनींमध्ये आता टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. मुर्धा, राई, मोर्वा, डोंगरी, उत्तन, पाली, चौक या गावांनी मात्र आपले गावपण अजूनही जपून ठेवले आहे.

भाईंदर पश्चिम भागात ग्रामपंचायत असताना या ठिकाणी मराठी भाषिक बहुसंख्येने होते. त्यानंतर काही प्रमाणात ख्रिस्ती धर्मीय तसेच मारवाडी आणि गुजराती समाज राहत होता. मात्र नगर परिषद आणि महापालिकेच्या स्थापनेनंतर या ठिकाणी बांधकाम व्यवसायाला तेजी आली. परिणामी स्थानिकांच्या तुलनेत बाहेरून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या प्रचंड झाली. जैन, गुजराती आणि मारवाडी समाज मोठय़ा संख्येने या ठिकाणी राहायला आला. त्यामुळे मूळच्या मराठी भाषकांची संख्या तुलनेने फारच रोडावली आहे. एकीकडे शहरीकरणामुळे बहुमजली इमारती उभ्या राहत असताना दुसरीकडे या भागात झोपडपट्टय़ाही जोमाने उभ्या राहिल्या. त्यामुळेच गणेश देवल नगर, जय अंबे नगर, गांधीनगर, लालबहादूर शास्त्री नगर, भोला नगर या वस्त्यांमधून उत्तर भारतीयांची संख्याही प्रचंड आहे.

नगर परिषदेच्या काळात या भागावर काँग्रेसचे आणि महापालिका स्थापनेनंतर पहिली १० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले. राष्ट्रवादीचे आणि आता शिवसेनेत सामील झालेले गिल्बर्ट मेन्डोन्सा यांची या भागावर मजबूत पकड होती, परंतु गेल्या पाच वर्षांत हे चित्र बदलले आहे. भाजपनेही या परिसरात चांगला जम बसवला असून २०१२ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बरोबरीने भाजपचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आहेत. राई, मुर्धा आणि मोर्वा या गावांमध्ये शिवसेनेने आपली ताकद निर्माण केली आहे. या ठिकाणी चारही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. उत्तनमध्ये गिल्बर्ट मेन्डोन्सा यांची वैयक्तिक ताकद आहे. मात्र या निवडणुकीत या ठिकाणचे राजकीय चित्र पूर्णपणे बदललेले दिसणार आहे. मेन्डोन्सा शिवसेनेत गेल्याने या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व जवळपास पूर्णपणे मिटले आहे. त्यामुळे भाईंदर पश्चिम भागात भाजप विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगणार आहे.

गेल्या पाच वर्षांत या भागांतील काही समस्या अद्याप मार्गी लागलेल्या नाहीत. उत्तन येथील घनकचरा प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येवर अद्याप तड लागलेली नाही. कोळी समाजाच्या घरांच्या मालकीचा हक्क, मासेमारी व्यवसायासाठी आवश्यक असलेला बाजार, मासळी सुकविण्याच्या जागा, जेटी आदी समस्या आजही कायम आहेत, राई, मुर्धा, मेर्वा भागांतील रहिवाशांना त्यांच्या जमिनींचे प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही. भाईंदर पश्चिम भागातील पाणीटंचाई सध्या काही प्रमाणात दूर झाली असली तरी पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार होत असल्याचे चित्र आहे.

मीरा-भाईंदर शहराला दूरदर्शी नेतृत्व नाही हे नागरिकांचे दुर्दैव आहे. राजकीय पक्षांकडून योजनांची केवळ दिवास्वप्नेच दाखवलेी जातात. त्यामुळे लोकांच्या गरजा लक्षात घेऊन दूरगामी परिणाम साधणाऱ्या योजना राबवणाऱ्या सुशिक्षित लोकप्रतिनिधींनी निवडून येणे आवश्यक आहे.   – अमोल पणशीकर

महानगरपालिकेच्या सभागृहात काही ठरावीक नगरसेवक सोडले तर इतर नगरसेवक बोलतच नाहीत, अशी परिस्थिती दिसून येत असते. त्यामुळे शहरातील समस्यांची, शहराच्या इतिहास आणि भूगोलाची व्यवस्थित माहिती असणारे अभ्यासू आणि सुशिक्षित नगरसेवक निवडून यावेत. – अ‍ॅड. प्रवीण पाटील

 

*  एकूण मतदार – १,५१,८८६

* पुरुष मतदार – ८३,३९०

* स्त्री मतदार – ६८,४८९

* भाईंदर पश्चिम भागात सध्या पालिकेचे १, ६, ७, ८, २३ आणि २४ असे सहा प्रभाग असून येथील निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या २३ आहे.