शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध; मेट्रो, कलादान, क्रीडा संकुलाच्या उभारणीचे आश्वासन

मीरा-भाईंदर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मानल्या जाणाऱ्या धोकादायक इमारती आणि वाहतूक कोंडीच्या मुद्दय़ांना स्पर्श करत पालिकेमध्ये भाजपसोबत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने शनिवारी ठाण्यात वचननामा प्रसिद्घ केला. भाजपला दूर ठेवत शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यामुळे मीरा-भाईंदरची निवडणूकही दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक येत्या २० ऑगस्टला होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी शनिवारी मीरा-भाईंदर शहराचा वचननामा प्रसिद्घ केला. ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांच्या ढोकाळी भागातील कार्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख व आमदार प्रताप सरनाईक  उपस्थित होते. राज्यात एकत्र सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भाजप यांनी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या आहेत. त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूकही  स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे शिवसेनेने स्वतंत्रपणे जाहीर केलेल्या वचननाम्यावरून आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे या निवडणुकीतही दोन्ही पक्ष आमने-सामने येऊन त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची लढाई होण्याची चिन्हे आहेत.

वचननाम्यातील घोषणा..

समूह पुनर्विकास योजना, मेट्रो, रो-रो सेवा, जल वाहतूक, रोपवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, बाळासाहेब ठाकरे कलादालन, आगरी कोळी भवन व हिंदी भाषिक भवन, आदिवासी विद्यार्थी वसतिगृह, महिला बचतगट भवन, घोडबंदर किल्ला परिसरात शिवसृष्टी, नवघर-कनकिया आणि घोडबंदर चौपाटी, भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय, ज्येष्ठ नागरिक भवन, नाटय़गृह, न्यायालयाची इमारत, आरमार केंद्र, ग्रंथालय, तरण तलाव आणि स्पोटर्स कॉम्प्लेक्स अशा  घोषणा वचननाम्यामध्ये आहेत.

ठाण्यात मोठय़ा प्रकल्पांचे उद्घाटन

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नॅस्टिक सेंटर, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, ग्रँड सेंट्रल पार्क अशा मोठय़ा प्रकल्पांचे भूमीपूजन तसेच पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील कम्युनिटी पार्कचे लोकार्पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात जे मनोमीलन आणि युती झाली आहे ती दीर्घकाळ टिकून राहावी, अशी आशा ठाकरे यांनी  व्यक्त केली. ठाण्यात चांगले काम करणाऱ्या आयुक्तांची जशी परंपरा आहे, तशीच आयुक्तांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचीही आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी शिवसेना प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे नेहमीच उभी राहिली आहे  असे सांगितले.