मीरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
मीरा रोड येथील एका नामांकित शाळेतील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तीन नराधम शिक्षकांनी वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून शाळेत सीसीटीव्ही बसवणे, समुपदेशक नेमणे यांसह अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. खुद्द पालिकेनेही आपल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
मीरा रोड येथील त्या घृणास्पद घटनेनंतर खासगी शाळांत सीसीटीव्ही बंधनकारक करण्याची मागणी होत आहे. अनेक पालकांनी तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी मिळत नाही; तोपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठवण्याचाही इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर शाळांमधील सुरक्षेचा मुद्दा अधिक प्रखर होऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या शिक्षण विभागाने शहराती सर्व शाळांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचनाही देण्यात येणार आल्याचे देशमुख यांनी सांगितले. बदलापूर येथील एका शाळेने विद्यार्थ्यांच्या दफ्तरात एक विशिष्ट टॅग बसवला आहे. या टॅगमुळे विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना तसेच शाळेतून बाहेर पडताना तसा संदेश ताबडतोब संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर जातो. अशा प्रकारचे नवे तंत्रज्ञान शाळांनी वापरणे आवश्यक असल्याचे शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांनी सांगितले.

पालिका शाळांवर सीसीटीव्हीची नजर
महानगरपालिकेच्या १७ शाळांच्या इमारतींमधून मराठी, हिंदी, गुजराती व हिंदी माध्यमांच्या ३५ शाळा भरतात. यात सुमारे साडे नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, यात पाचवी ते सातवी या इयत्तेतील विद्यर्थिनींची संख्या सुमारे तीन हजार एवढी आहे. शाळांमधून सीसीटीव्ही बसविल्यानंतर त्यांचा नियंत्रण कक्ष मुख्याध्यापकांच्या कार्यालयात ठेवण्याचा मानस आहे. यामुळे केवळ विद्यर्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांना शिक्षण योग्य पद्धतीने दिले जात आहे की नाही यावरही लक्ष ठेवणे शक्य होईल, अशी माहिती आयुक्त अच्युत हांगे यांनी दिली.
शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात पंचाहत्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र त्याचा नियंत्रण कक्ष, देखभाल याची जबाबदारी कोणाकडे असेल यावर पोलीस विभाग व महानगरपालिका प्रशासन यांच्यात अद्याप एकमत झाले नसल्याने हा निधी पालिकेच्या तिजोरीत तसाच पडून आहे. त्यामुळे आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात पालिका शाळांमधून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्गदर्शक तत्त्वे
’स्वच्छतागृहे वगळता शाळेत सर्वत्र सीसीटीव्ही.
’शिक्षकांची नेमणूक करताना त्यांना वर्तणूक दाखला देणे बंधनकारक.
’शाळेत सुरक्षारक्षक नेमताना त्यांचीही पोलीस पडताळणी करण्यात आली आहे का याची खातरजमा करावी.
’विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत समुपदेशक नेमावा.
’वेळोवेळी पालक शिक्षक सभा घेऊन त्यात पालकांच्या अडचणी, त्यांच्या सूचना, पाल्यांची शैक्षणिक प्रगती याबाबत त्यांच्याशी सुसंवाद साधावा.