वसई : मीरा रोड येथील निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी मनोज साने याने सरस्वती वैद्य हिच्याशी मंदिरात लग्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी तिच्या तीन बहिणींनी पोलिसांसमोर येऊन ही महत्त्वाची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरस्वतीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या मृतदेहाची छायाचित्रे काढली. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, मृतदेह सडण्याची प्रक्रिया किती वेळाने सुरू होईल, याची माहिती तो गूगलवर शोधत होता, हेही तपासातून उघड झाले आहे. तो पोलिसांना दिशाभूल करणारी वेगवेगळी माहिती देत आहे. आधी त्याने सरस्वती अनाथ होती, आपल्याला दुर्धर आजार असल्याने आमचे लैंगिक संबंध येत नव्हते, असे सांगितले, तर नंतर आपण नपुंसक असल्याचा जबाब त्याने पोलिसांना दिला. सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या मोबाइलमधील मजकूरही त्याने नष्ट केला. त्याच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळला असून तो ‘बाहेरख्याली’ स्वभावाचा असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आरोपी सानेच्या जबाबात संगती नसल्याने पोलिसांना निश्चित अशा निष्कर्षांपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे.

हेही वाचा >>> Mira Road Murder : ‘मनोज साने आणि सरस्वतीने लग्न का लपवलं होतं?’ पोलिसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर सरस्वती मुंबईत बहिणीकडे राहात होती. नोकरी शोधत असताना २०१३ मध्ये तिची ओळख आरोपीशी झाली. त्याने तिला घरी आसरा दिला. याच काळात त्याने तिचा विश्वास संपादन करून मंदिरात लग्न केले. मात्र दोघांच्या वयात मोठे अंतर असल्याने आरोपी तिचा मामा असल्याचे सांगत असे. तिनेही आश्रमात सानेची ओळख आपला मामा अशी करून दिली होती, असे सांगण्यात येते. ‘‘गेल्या काही वर्षांपासून ती ख्रिस्ती धर्माचे पालन करत होती. त्यामुळेही आमच्यात मतभेद होत होते,’’ अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

सानेचे कोणीही जवळचे नातेवाईक नाही. त्याने आयटीआय शिक्षण घेतले असून पोलीस त्याचा पूर्वेतिहास तपासत आहेत.

हेही वाचा >>> Mira Road Murder : सरस्वती आणि मनोज साने यांनी मंदिरात केले होते लग्न, सरस्वतीच्या ३ बहिणींची डीएनए चाचणी

पहिल्या दिवसापासून साने दिशाभूल करणारी माहिती पोलिसांना देत आहे. प्रथम त्याने सरस्वती अनाथ असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी हत्याच्या बातम्या पाहून सरस्वतीच्या तीन बहिणी पोलीस ठाण्यात हजर झाल्या. त्या एकूण पाच बहिणी. नगर येथील जानकीबाई आपटे आश्रमात त्या राहत होत्या. सर्व बहिणींची लग्ने झाली असून त्यातील तिघी जणी मुंबईत राहतात. त्यांनी सरस्वतीच्या मृतदेहाचा ताबा मागितला आहे. मात्र त्यांचे ‘डीएनए’ नमुने तपासल्यानंतर सरस्वतीचा मृतदेह त्यांच्याकडे सोपवण्यात येईल, असे उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले. जेजे रुग्णालयाने शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला असला तरी तिच्या मृतदेहाचे अवशेष जुळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी कर्जबाजारी

साने बोरिवली येथील एका शिधावाटप दुकानात पाच हजार रुपये वेतनावर अर्धवेळ काम करत होता. बोरिवली येथील घरापोटी त्याला ३५ हजार रुपये भाडे मिळत होते. तो कर्जबाजारीही झाला होता. सोसायटीचा देखभाल खर्च भरण्यासाठी त्याने कर्जही काढले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira road murder case accused manoj sane search body dispose method on google zws
First published on: 10-06-2023 at 01:45 IST