सध्या महाराष्ट्रासह देशभरात मीरा रोडमधल्या सरस्वती वैद्य हत्या प्रकरण चर्चेत आहे. मीरारोड भागात मनोज सानेसह लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्यची निर्घृण हत्या करण्यात आली असून मनोज सानेनं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे मीरारोडसह आसपासच्या भागात खळबळ उडाली आहे. मनोज सानेनं हे कृत्य नेमकं का केलं? त्यांच्यात असा काय वाद झाला? यासंदर्भात पोलीस सविस्तर तपास करत असतानाच या प्रकरणाचं थेट दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाशी साम्य असल्याचं बोललं जात आहे. या दोन्ही प्रकरणांमधल्या समान बाबीही चर्चेत आहेत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलं मीरारोड हत्या प्रकरणात?

मीरारोडमध्ये गेल्या तीन वर्षांपासून वास्तव्य करणारे मनोज साने (५६) व सरस्वती वैद्य (३२) हे १० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. बुधवारी त्यांच्या फ्लॅटमधून अतीदुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करताच धक्कादायक दश्य नजरेस पडलं. आधी पोलिसांना सरस्वतीचे पाय सापडले. नंतर घराच्या आतल्या भागात तिचं धड, शीर, हात अशा वेगवेगळ्या अवयवांचे तुकडे कापून बादली, पातेल्यात लपवून ठेवल्याचं दिसून आलं. मनोज सानेनं सरस्वतीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. काही तुकडे त्यानं कुकरमध्ये शिजवले, तर काही गॅसवर भाजले. काही तुकडे तर बारीक करण्यासाठी मिक्सरमध्ये घातल्याचंही पोलिसांना समजलं.

दिल्लीत काय घडलं होतं?

गेल्या वर्षी दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची देशभर चर्चा झाली. आफताब पूनावालासोबत श्रद्धा वालकर लिव्ह-इनमध्ये राहात होती. नवी मुंबईत काही वर्षांपूर्वी श्रद्धानं आफताब मारहाण करत असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, ती तक्रार तिनं काही दिवसांनी मागे घेतली. गेल्या वर्षी आफताबनं श्रदाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते वेगवेगळ्या भागात फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली. कालांतराने हे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यातलं हे धक्कादायक वास्तव जगासमोर आलं.

दोन्ही प्रकरणांमध्ये साधर्म्य काय?

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि मीरारोड परिसरात घडलेलं सरस्वती वैद्य हत्या प्रकरण यातील काही साम्य असणाऱ्या बाबी आता चर्चेत आल्या आहेत. त्यात या प्रकरणांच्या वेगवेगळ्या पैलूंचा समावेश आहे.

लिव्ह-इन संबंध

या दोन्ही घटनांमध्ये लिव्ह-इन संबंध ही समान गोष्ट आहे. आफताब पूनावाला-श्रद्धा वालकर व मनोज साने-सरस्वती वैद्य हे दोन्ही जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.

वास्तव्य

दोन्ही जोडपे स्वतंत्रपणे भाड्याच्या घरात राहात होते.

आफताब पुनावालाच्या क्रूरतेने इतर गुन्हेगारांना प्रोत्साहन? ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय? वाचा…

मृतदेहाची विल्हेवाट

या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपी पुरुषानं महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एकच पद्धती अवलंबली. दोन्ही घटनांमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आली होती.

शिवाय, दोन्ही घटनांमध्ये आरोपी पुरुष लिव्ह-इन पार्टनर मृतदेहाचे तुकडे बॅगेत भरून बाहेर टाकण्यासाठी जाताना CCTV फूटेजमध्ये दिसून आले.

साधर्म्य नसणाऱ्या गोष्टी…

दरम्यान, एकीकडे दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य सांगणाऱ्या काही गोष्टी असल्या, तरी काही गोष्टींमध्ये या दोन्ही घटना वेगळ्या असल्याचं दिसून येतं.

मृतदेह ठेवणे

आफताब पूनावालानं श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे करून ते एका फ्रीजमध्ये ठेवले होते. मग रोज काही तुकड्यांची तो विल्हेवाट लावत असे. मनोज सानेनं सरस्वती वैद्यच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि बादली व पातेल्यात लपवून ठेवले.

विल्हेवाट लावताना आफताब सुटला, साने सापडला

आफताब पूनावालानं महिनाभर रोज मृतदेहाच्या काही तुकड्यांची विल्हेवाट लावली. पोलिसांच्या तावडीत तेव्हा तो सापडला नाही. मनोज सानेनं तीन दिवसांत मृतदेहाच्या काही तुकड्यांची विल्हेवाट लावली. त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि…; काय आहे मीरारोड हत्या प्रकरण?

सरस्वती वैद्य हत्या प्रकरणात पोलिसांना काय काय सापडलं?

मीरारोड हत्येच्या घटनास्थळावरून पोलिसांना काही वस्तू सापडल्या आहेत. त्यात निलगिरी तेलाच्या पाच छोट्या बाटल्या, १ हातोडा, १ टाईल कटर, मृतदेहाचे तुकडे ठेवलेला कुकर, मृतदेहाचे तुकडे असणारा स्टीलचा चमचा, मृतदेहाचे शिजवलेले तुकडे ठेवलेल्या दोन प्लास्टिकच्या बादल्या, मृतदेहाचे तुकडे ठेवलेला एक प्लास्टिक टब, मृतदेहाचे तुकडे भाजलेला एक पितळेचा पॅन, एक काळ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी, लाकूड कापण्याचं एक विद्युत कटर अशा वस्तूंचा समावेश आहे.

कॉपीकॅट क्राईम म्हणजे काय?

कॉपीकॅट क्राईम म्हणजे वास्तवात घडलेल्या एखाद्या गुन्ह्यावरून प्रेरणा घेऊन किंवा काल्पनिक गुन्ह्यांवर आधारित मालिका/चित्रपटावरून प्रेरणा घेऊन तशाच प्रकारे केला जाणारा गुन्हा. ज्या गुन्ह्यांना माध्यमांमधून अधिक प्रसिद्धी मिळाली त्या गुन्ह्यांमध्ये अशाप्रकारची पुनरावृत्ती होण्याची अधिक शक्यता वर्तवली जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira road saraswati vaidya murder case similar to shraddha walkar aftab poonawala copycat crime pmw
First published on: 09-06-2023 at 13:03 IST