ठाणे : पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड येथील भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबीयांशी संबंधित सेव्हन स्क्वेअर अकॅडमी नावाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ तसेच मांसाहारी पदार्थ आणू नयेत, असे आवाहन पालकांना करण्यात आल्याने आता या मुद्द्याला राजकीय रंग चढला आहे. शाळेच्या या सूचनेवरून चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांचा फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत त्यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. पर्युषण पर्वात कांदा, लसूण चालत नाही. मात्र, आषाढी एकादशीला गोवा बँकॉक चालते, असा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे.

पर्युषण हा जैन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र कालावधी मानला जातो. या काळात कंदमुळे व मांसाहारी पदार्थ टाळण्याची धार्मिक प्रथा आहे. त्याच पार्श्वभूमीवर सेव्हन स्क्वेअर अकॅडमीकडून पालकांना विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ तसेच मांसाहारी पदार्थ देऊ नयेत, अशी विनंती करण्यात आली. शाळेच्या कॅन्टीनमध्येही या काळात अशा पदार्थांचा वापर न करण्याचे सांगण्यात आले. या सूचनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत धार्मिक नियम लादले जात असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणात कोणतीही सक्ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पर्युषण काळात प्राणिहिंसा टाळावी व धार्मिक भावनांचा आदर करावा, या उद्देशाने पालकांना केवळ विनंती करण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून प्रताप सरनाईक यांनी मेहता यांचा फोटो शेअर करत उपरोधिक टिप्पणी केली आहे. पर्युषणच्या पवित्र काळात कांदा, लसूण, बटाटा व बीट खाण्यास विरोध करणे ठीक आहे. पण आषाढी एकादशीला नगरसेवक एकत्र गोवा व बँकॉकच्या सहलींवर असतील, तर मग फक्त कांदा-लसूणच नाही, तर बाकी सगळंही चालत, अशा आशयाचा टोला सरनाईक यांनी लगावला आहे.

सरनाईकांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक आहाराच्या मुद्द्याला थेट राजकीय वादाची किनार मिळाली आहे. एका बाजूला पर्युषण काळातील धार्मिक प्रथा आणि प्राणीहिंसा टाळण्याचा मुद्दा आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच धार्मिक भूमिकेवरून मेहता यांना लक्ष्य करत सरनाईकांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मिरा-भाईंदरच्या राजकारणात मेहता व सरनाईक यांच्यातील राजकीय संघर्ष यापूर्वीही विविध मुद्द्यांवरून पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता शाळेतील आहाराच्या सूचनेवरून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत. धार्मिक प्रथा, शाळेतील विद्यार्थ्यांचा आहार व त्यातून निर्माण झालेला राजकीय वाद यामुळे पर्युषणातील हा मुद्दा आता मिरा-भाईंदरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. मेहता यांनी ‘सक्ती नाही, केवळ विनंती’ अशी भूमिका स्पष्ट केली असताना, सरनाईकांच्या ‘गोवा-बँकॉक’च्या टोमण्यामुळे या वादाला राजकीय धार मिळाली आहे. यामुळे हा वाद आता पुढे काय रंग घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.