ठाणे: मीरा रोड (पूर्व) येथील कनकिया रोडवरील ”स्टार मार्केट” या आस्थापनेत अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. फळे-भाज्यांच्या प्लास्टिक क्रेटमध्ये उंदरांचा मुक्त संचार, बुरशी लागलेला भाजीपाला, उंदरांनी कुरतडलेली फळे, झुरळांचा वावर तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. संबंधित आस्थापनेविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभाग अन्न व औषध प्रशासनाने दिली.

मीरा रोड (पूर्व) येथील कनकिया रोडवरील स्टार मार्केटमधील फळे व भाजीपाला ठेवलेल्या क्रेटमध्ये उंदरांचा वावर असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. सहाय्यक आयुक्त (अन्न) ठाणे-६ यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दोलताडे यांनी ७ जुलै रोजी संबंधित आस्थापनेची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान आस्थापनेतील स्वच्छतेबाबत गंभीर निष्काळजीपणा समोर आला.

फळे, भाजीपाला आणि पालेभाज्यांची विक्री अत्यंत अस्वच्छ वातावरणात होत असल्याचे दिसून आले. विक्रीसाठी ठेवलेल्या कलिंगड, काकडीसह विविध फळे-भाज्यांवर बुरशी आढळली, तर टोमॅटो, टरबूज आणि इतर काही फळे-भाज्या उंदरांनी कुरतडल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले. याशिवाय फळे-भाज्या ठेवलेल्या ठिकाणी झुरळांचाही वावर आढळून आला.

तपासणीदरम्यान दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या साठवणुकीतही गंभीर नियमभंग उघडकीस आला. संबंधित उत्पादनांच्या लेबलवर ४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात साठवणूक करण्याच्या सूचना असतानाही ते तब्बल ८.७ अंश सेल्सिअस तापमानावर ठेवण्यात येत असल्याचे आढळले. तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे हे गंभीर उल्लंघन असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सहाय्यक आयुक्त (अन्न) धनश्री ढाणे यांनी ८ जुलै रोजी ”स्टार मार्केट”चा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला. संबंधित आस्थापनेविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभाग अन्न व औषध प्रशासनाने दिली.

दरम्यान, अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला असून, नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना त्यांच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.