बेपत्ता मुलांचा खाडीत बुडून मृत्यू?

एकाच दिवशी दोन मुले गायब झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.

ठाणे : मुंब्रा शहरातून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले सागर गायकवाड (१३) आणि सक्षम इंगळे (१४) मुंब्रा खाडीत बुडाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सागर आणि सक्षम बेपत्ता झाल्यानंतर या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच त्यांच्या मित्रांची चौकशी केल्यानंतर ते बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दलाचे जवान त्यांचा खाडीत शोध घेत आहेत. गुरुवारी दुपारी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नाही.

पारसिक नगर येथील रेतीबंदर परिसरात सागर आणि सक्षम राहत होते. रविवारी दुपारी ते फिरण्यासाठी बाहेर गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी आले नव्हते. या प्रकरणी सागर आणि सक्षम यांच्या कुटुंबीयांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकाच दिवशी दोन मुले गायब झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.

प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले त्या वेळी सागर आणि सक्षम हे त्यांच्या आणखी दोन मित्रांसोबत एका ठिकाणी जात असल्याचे दिसले. त्यानंतर दुसऱ्या एका सीसीटीव्ही चित्रीकरणात ही दोन्ही मुले घरी परतताना दिसत होती. मात्र, त्यांच्यासोबत सागर आणि सक्षम नव्हते. पोलिसांनी या दोन्ही मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, हे चौघे जण मुंब्रा खाडीत पोहण्यासाठी गेले, परंतु पाण्याचा अंदाज नसल्याने सागर आणि सक्षम बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दलाचे जवान आणि मुंब्रा पोलीस कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Missing children from mumbra drown to death in creek zws

ताज्या बातम्या