scorecardresearch

भाषाप्रभूच्या वास्तूचा गैरवापर

साहित्यिक भावे यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात हाही यामागील उद्देश होता.

साहित्यिक, सारस्वतांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत भाषाप्रभू, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत पु. भा. भावे यांच्या नावाची वास्तू आहे. साहित्यिक भावे यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात हाही यामागील उद्देश होता. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील वाटवेवाडीत भावे यांचे निवासस्थान होते. पु. भा. भावे यांच्या आठवणीचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने भावे राहत असलेल्या भागात दोन मजली वास्तू उभारली. या वास्तूला पु. भा. भावे यांचे नाव दिले. भावे हे साहित्यिक असल्याने या वास्तूत एखादे वाचनालय, ग्रंथालय सुरू होईल. त्यांचे समग्र साहित्य या वास्तूत आपणास बघता येईल. त्यांची जुनी, दुर्मिळ विविध कार्यक्रमांमधील छायाचित्रे, त्यांना मिळालेले पुरस्कार या वास्तूत मांडून ठेवण्यात येतील, असे शहरवासीयांना वाटले होते. मात्र ते सारे फोल ठरले. या वास्तूत तळमजल्यावरील सभागृहात निवडणूक कार्यालय अनेक वर्ष ठाण मांडून आहे. पहिल्या माळ्यावर डोंबिवलीकर नागरिकांना सात-बाराचे उतारे, मालमत्ता कराची फेरबदलाचे काम करणारे कार्यालय आहे.
भावे सभागृहाच्या वास्तूत प्रवेश करतानाच दरुगधीनेच स्वागत होते. या वास्तूच्या कोपऱ्यावर अनेक वर्षांपासून कचराकुंडी आहे. ही कचराकुंडी सतत भरून वाहत असते. सातबारा उतारे घेण्यासाठी गावकऱ्यांची या ठिकाणी वाहने लागलेली असतात. या वास्तूत सरकारी कार्यालये असल्याने इमारती, जिन्यांचे कोपरे तंबाखू, पानांच्या पिचकाऱ्या मारून खराब केल्या आहेत. या इमारतीत या पुढील काळात पालिकेकडून भावे यांच्या नावाने या वास्तूत काही भव्यदिव्य होईल याची सूतराम शक्यता नाही. या इमारतीसमोर जाताना येथे पु. भा. भावे यांच्या नावाची वास्तू आहे याची जराशीही कल्पनाही येत नाही. या इमारतीत गेलेल्या व्यक्तीला भावे यांच्या साहित्याचे दर्शन होत नाही, नजरेला पडतात केवळ सात-बारा उताऱ्यांची पुस्तके. या वास्तूचे नूतनीकरण करावे आणि भावे यांच्या नावाने नव-नवीन उपक्रम सुरू करावे, असे लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला काहीच वाटत नाही.

या इमारतीला भावे यांचे नाव असल्याने भावे यांचे समग्र साहित्य, त्यांच्या नावाने व्याख्यानमाला असे उपक्रम या वास्तूत सुरू राहणे अपेक्षित होते. पण अनेक वर्ष झाली या वास्तूत साहित्यिक कार्यक्रम होताना दिसत नाहीत. – प्रमोद दलाल, डोंबिवली

महापालिकेने भावे यांच्या नावाने असलेल्या वास्तूचा चालवलेला व्यापार थांबविला पाहिजे. येथील सरकारी कार्यालये अन्यत्र हलवली पाहिजेत. भावे यांचे समग्र साहित्य, त्यांची दुर्मिळ छायाचित्र, पुरस्कार या वास्तूत ठेवण्यात यावेत.
– अ‍ॅड. शिरीष देशपांडे, डोंबिवली

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या