ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून नवी मुंबईत पक्षाचे नेतृत्व करणारे मनोहर मढवी (एम. के) यांच्यासह तीन तर, काँग्रेसच्या दोन अशा एकूण पाच नगरसेवकांनी मंगळवारी शिवसेना (शिंदे गट) पक्ष प्रवेश केला. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात हा पक्ष प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एम के मढवी यांच्या प्रवेशाबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात असताना प्रवेशमागील मूळ कारण मढवी यांनी स्पष्ट केले आहे.

शहरात पालिका निवडणुकांची तारीख निश्चित झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवी मुंबई महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून शिंदेची शिवसेना विरुद्ध वन मंत्री गणेश नाईक असा सामना रंगताना दिसत आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच दोन्ही नेत्यांकडून इतर पक्षातील नगरसेवकांना गळा लावत पक्षात घेण्याची मालिका जोर धरू लागली आहे. असे असतानाच, सोमवारी नवी मुंबई महापालिकेची निवडणुक जाहीर झाली असतानाच, दुसऱ्याच दिवशी शिंदेच्या शिवसेनेने ठाकरे गटाच्या तीन तर काँग्रेसच्या दोन अशा एकूण पाच नगरसेवकांना पक्ष प्रवेश केला.

ठाणे येथील टिपटाॅप प्लाझा येथे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यादरम्यान, नवी मुंबईतील ठाकरे गटाचे नगरसेवक मनोहर मढवी (एम.के), विनया मढवी, करण मढवी तर काँग्रेसचे नगरसेवका पूनम पाटील आणि नगरसेवक अमित पाटील या पाच नगरसेवकांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. यामुळे राजकीय लढतींना वेगळा रंग चढला आहे. अशातच मढवी यांच्या पक्ष प्रवेशामागे नाराजीचे कारण आहे की इतर काही या बाबत चर्चा होत असून मढवी यांनी याचे मूळ कारण स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले एम के मढवी

मंगळवारी झालेल्या पक्ष प्रवेशाबाबत बोलत असताना माझ्या व्यक्तिगत कारण आणि प्रभागाच्या विकासासाठी पक्ष प्रवेश केला असल्याचे एम के मढवी यांनी स्पष्ट केले आहे. माझ्या मनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्री बाबत आदर होता, आहे आणि राहणार असेही ते यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली मला काम करायचे आहे. कोणावरही नाराजी नसून व्यक्तिगत आणि कुटुंबाच्या कारणासाठी पक्ष प्रवेश केला असल्याचे मढवी यांनी सांगितले.