लोकसत्ता प्रतिनिधी ठाणे : लोकसभा निवडणूकीत महायुतीवरील लोकांचे प्रेम कमी झालेले दिसले. त्यावेळी काही चुका घडल्या होत्या आणि घडलेल्या चुकांचा हा निकाल आहे. परंतु आता त्यात सुधारणा करून काठावर यश नको, तर घवघवीत यश मिळायला हवे अशा कानपिचक्या भाजपचे ठाणे जिल्ह्यातील बडे नेते आणि बेलापूरचे आमदार गणेश नाईक यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या. तर, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना जे प्रमुख नेते आहेत, त्यांचे चेहरे विरुध्द दिशेला असू नयेत, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी दिला. ठाण्यात बुधवारी महायुतीची समन्वय बैठक पार पडला. या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड, गणेश नाईक, खासदार नरेश म्हस्के, डॉ. श्रीकांत शिंदे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेश नाईक यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या. लोकसभा निवडणूकीत लोकांचे प्रेम कमी झालेले दिसले. त्यावेळी काही चुका घडल्या होत्या आणि घडलेल्या चुकांचा हा निकाल आहे. राजकारणात वेळेला महत्त्व असते असे आमदार गणेश नाईक म्हणाले. आणखी वाचा-बदलापूर पालिकेच्या नव्या इमारतीत कर्मचाऱ्यांची लगबग; उद्घाटनापूर्वी दालन व्यवस्था, सजावटीसाठी धावाधाव, स्वातंत्र्यदिनी लोकार्पण लोकसभेला निवडणूकीत खोटे कथानक पसरविण्यात आले होते. हे खोट कथानक समाजमाध्यमाद्वारे खोडण्यासाठी एकत्र असणे गरजेचे आहे असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. समन्वय साधला तरच पुढचा काळ चांगला आहे, लोकसभेत वाद झाले नव्हते. परंतु जागा वाटपाला उशीर झाला होता. आता तसे होणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरीष्ठ नेते ठरवतील असेही त्यांनी सांगितले. कोकणात ७४ जागा असून त्या सर्वच जागा महायुती लढणार आहे असेही ते म्हणाले. महायुतीच्या माध्यमातून येत्या २४ ऑगस्ट पासून प्रचार यात्रेला सुरवात होणार आहे. ठाण्यातून पहिली प्रचार यात्रा निघणार असून पालघर, नवी मुंबई अशी ही यात्रा असणार आहे. ‘एकजूट महाराष्ट्रासाठी, अभियान विकासासाठी- कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले. आणखी वाचा-राष्ट्रवादीचे खासदार म्हणतात, “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे” निवडणुक प्रचारात प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा वेगवेगळा गमछा घालून प्रचार करत असतो. त्यातून काही वेळेस महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होतात. मात्र आता महायुतीचा एकच गमछा ठेवा आणि त्यावर तीनही पक्षाच्या चिन्हाचा वापर करावा असा सल्लाही यावेळी देण्यात आला. तिघे एकत्र येण्याची वेळ आपल्यावर वरिष्ठांमुळे आली - कपिल पाटील तिघे एकत्र आल्याशिवाय सत्ता येत नाही. त्यामुळे आपण तिन्ही पक्ष एकत्र आलो. ही परिस्थिती आपल्यावर वरिष्ठांनी निर्माण करून दिली आहे. ही परिस्थिती स्विकारून महायुतीचा कार्यकर्ता म्हणून कामाला लागायला हवे. महायुतीचा प्रचार एकत्र मिळून करायला हवा असे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले. चुका करा, परत-परत करा, पण एकच चुक परत-परत करू नका असे सांगत एकमेकांच्या संख्या कमी करु नका असेही ते म्हणाले. ‘तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ’ असे कार्यकर्ते म्हणतात, पण ‘महायुती आगे बढो, हम तुम्हारे साथ हे’ असे कधीतरी म्हणा असा सल्लाही त्यांनी दिला.