ठाणे : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना (शिंदे) पक्षात सामील झालेल्या कळव्यातील माजी नगरसेवकांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्ता मेळाव्यात टिका केली आहे. विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असे काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणिते सुरळीत करण्यासाठी पक्ष प्रवेशाच्या घडामोडी झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच माझ्या बाजूला बसून माझ्या मागे बॉम्ब लावत होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे निकटवर्तीय समजले जाणारे ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी आणि युवा नेते मंदार केणी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला.
या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांनी गुरूवारी कळव्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती लावून पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांवर टिका केली. आधी भाजपमध्ये जाणार असे ठरले असताना अचानक शिवसेनेत कसे गेले हा मोठा प्रश्न आहे. विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असा काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणिते सुरळीत करण्यासाठी झालेल्या या घडामोडी आहेत, असा दावा आव्हाड यांनी केला.
मी चिंता करणारा माणूस आहे. पण, पक्ष प्रवेश घडामोडीची मला चिंता वाटली नाही. कारण, गेल्या एक वर्षापासून मला छळत होते. माझ्या बाजूला बसून माझ्या मागे बॉम्ब लावत होते. या आजारपणाची मला सवय झाली होती. फक्त अंगावरचा फोड फुटला. फोड होता तेव्हा दुखायचे पण, आता गेला तेव्हा काही वाटत नाही.
अजिबात दुख नाही, यातना नाही, आता बर वाटत आहे, असे ते म्हणाले. लोकांमध्ये प्रचंड राग आहे, लोक हाच प्रश्न विचारतात की आव्हाडांनी काय कमी केले होते. आपण लोकांमध्ये जाणारी लोक आहोत आणि आपण सगळे निष्ठावान एका बापाला बाप मानणारी माणसे आहोत, असेही ते म्हणाले. गेले वर्षभर मला त्रास होता. पण, मनोहर साळवी यांनी केव्हाच त्रास दिला नाही, तो मोठ्या मनाचा माणूस आहे. तसेच मंदार केणी यानेही आपल्याला त्रास दिला नाही, अशी प्रांजळ कबुली त्यांनी यावेळी दिली.
मुनीम प्रधान होत नसतो…
गावचा प्रधान आणि मुनीन याच्यांतील फरक सांगत पक्ष सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांवर आव्हाड यांनी टिका केली. एक गावाचा प्रधान असतो, गावकरी त्याच्यावर प्रेम करत असतात, त्यांच्या अडअडचणीत प्रधान मदत करत असतो. परंतु मुलीच्या लग्नाच्या दिवशी गावात आग लागते आणि प्रधान तिकडे धावत जातो. जाताना मुनीमच्या खांद्यावर लग्नात येणाऱ्यांची जबाबदारी सोपवितो. तेव्हा लग्नात येणारे सर्वच त्याला मानसन्मान देतात. तेव्हा मुनीमला आपणच प्रधान झाल्याचा भास होतो. परंतु जेव्हा प्रधान येतो, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे जातात. यातून मुनीम हा केव्हाही प्रधान होत नसतो, हे लक्षात ठेवावे अशा शब्दात त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना सुनावले.