आयुक्तांवर राष्ट्रवादीचे दबावतंत्र, कडेकोट पोलीस बंदोबस्त

ठाणे : दिवा येथील एमएमआरडीए योजनेतील घर घोटाळा प्रकरणावरून आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पालिका आयुक्तांवर ‘शाई फेको’ आंदोलन करणार असल्याची वार्ता बुधवारी सकाळी पालिका मुख्यालयात वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच मुख्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले. बुधवारी सकाळपासूनच महापालिका मुख्यालयात पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करत आयुक्तांच्या कार्यालयाकडे जाणारे मार्ग काही काळ बंद ठेवले होते.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

दिवा येथील एमएमआरडीए योजनेतील घर घोटाळा प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणात दिवसभर घोषणाबाजी केल्यानंतरही महापालिका प्रशासन दाद देत नसल्याने कार्यकर्ते काकुळतीला आले होते. कुणीतरी मधस्ती करा आणि आंदोलन मागे घ्या यासाठीही राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी दिवसभर अधिकारी तसेच सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आर्जव करताना दिसत होते. मात्र उशिरापर्यत हा तिढा काही सुटला नाही आणि संतापलेले गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी थेट मुख्यालयात येत आयुक्तांवर निशाणा साधला.

 आयुक्तांना कणा नाही, स्वत:ची भूमिका नाही अशा शब्दात टीका करत आव्हाडांनी आयुक्तांविरोधात रणिशग फुंकताच सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयात ठाण मांडत आयुक्तांना गाठण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांविरोधात आंदोलन करण्याचा बेत आखला. या आंदोलनाची वार्ता पालिका मुख्यालयात वाऱ्यासारखी पसरली. या आंदोलनादरम्यान आयुक्तांवर शाई फेफण्यात येणार असल्याचे वृत्त पसरले आणि पोलीस सतर्क झाले. काही वेळातच पालिकेच्या सर्वच प्रवेशद्वारांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुख्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांची चौकशी करून त्यांना प्रवेश दिला जात होता. यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत होता.

आयुक्तांचा चकवा

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पालिका मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर जमून आयुक्त येण्याची वाट पहात थांबले होते. परंतु राष्ट्रवादीच्या आंदोलनाची माहिती मिळताच आयुक्तांनी कार्यकर्त्यांना चकवा देत दुसऱ्या वाहनाने पालिका मुख्यालयातील कार्यालय गाठले. यामुळे कार्यकर्ते तेथून निघून गेले. तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आयुक्त कार्यालय परिसरात जाणारे मार्ग पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी बंद ठेवले होते. पालिका मुख्यालयात आणि आयुक्त कार्यालयाभोवती पोलीस आणि सुरक्षारक्षकांचे कडे निर्माण करण्यात आले. हा सर्व प्रकार पाहून पालिकेत कामानिमित्त आलेले नागरिक चक्रावून गेले होते.

नागरिकांना मनस्ताप 

दुपारच्या वेळेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुन्हा पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर जमले.  त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे सुद्धा उपस्थित होते. कार्यकर्ते आयुक्त कार्यालयाबाहेर येण्याची वाट पहात पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर थांबले होते. यामुळे पालिका मुख्यालयात सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात वाढ केली होती. परंतु आयुक्त येणार नसल्याचे कळताच कार्यकर्ते पुन्हा निघून गेले. या सगळय़ा घडामोडींमुळे दैनंदिव तक्रारी घेऊन मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना मात्र बराच त्रास सहन करावा लागला.

सायंकाळी कार्यकर्तेच गायब

सायंकाळच्या वेळेत आयुक्त कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघतील, त्यावेळेस राष्ट्रवादी कार्यकर्ते शाई फेको आंदोलन करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सायंकाळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पालिका परिसरात  उपस्थित नव्हते. तरीही सायंकाळी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याभोवती पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी सुरक्षेचे कडे उभे करत त्यांना त्यांच्या वाहनापर्यंत नेले. त्यांनतर आयुक्त हे त्यांच्या वाहनाने पोलिसांच्या ताफ्यात घरी निघून गेले.