scorecardresearch

‘एमएमआरडीए’ची जिल्ह्यावर कृपादृष्टी

गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे जिल्ह्यातील विकास प्रकल्पांवर मात्र आपली कृपादृष्टी कायम ठेवली आहे.

रस्ते, मेट्रो, धरण प्रकल्पांसाठी निधीची तरतूद

जयेश सामंत-नीलेश पानमंद

ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे जिल्ह्यातील विकास प्रकल्पांवर मात्र आपली कृपादृष्टी कायम ठेवली आहे. पुढील काही महिन्यांत होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेने ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, पाणी पुरवठय़ाच्या सुविधाच्या सक्षमीकरणासाठी एकूण १७ प्रकल्पांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा वर्षांव केला आहे. ठाणे आणि कल्याणकरांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा मोठा निधी राखीव ठेवण्यात आला असून नवी मुंबईतील एपीएमसी ते तुर्भेला जोडणारा उड्डाणपूलाचा नवा प्रकल्प यंदा हाती घेतला जाणार आहे. या उड्डाणपूलासाठी ५० कोटी रुपये या वर्षांत खर्च केले जाणार आहेत. 

जिल्ह्यातील महापालिकांना आर्थिक मर्यादेमुळे पालिकांना मोठे प्रकल्प राबविणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरी हिताचे मोठे प्रकल्प एमएमआरडीएमार्फत जिल्ह्यात राबविले जात आहेत. त्यात मेट्रो, रस्ते, उड्डाण पूल अशा कामांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी एमएमआरडीएकडून अर्थसंकल्पात निधीची तरतूद दरवर्षी केली जात आहे. यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प एमएमआरडीएने तयार केला असून तो येत्या २८ फेब्रुवारीला संचालक मंडळापुढे सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील एकूण ८४ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी १७ हजार कोटी रुपयांची भरघोस आर्थिक तरतूद केली आहे. या प्रकल्पांमध्ये ठाणे जिल्ह्यातील १७ प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी १७ हजार कोटी रुपयांपैकी पाच हजार ५८ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्याचबरोबर त्यांच्याकडे एमएमआरडीएचा विभागही आहे. यामुळेच एमएमआरडीएने अर्थसंकल्पात जिल्ह्यावर कृपादृष्टी असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे, कल्याण मेट्रोसाठी भरपूर निधी

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याबरोबरच त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी एमएमआरडीएकडून विविध प्रकल्पांची आखणी केली आहे. त्यापैकी वडाळा ते कासारवडवली आणि ठाणे – भिवंडी -कल्याण या दोन मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील भार कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, भिवंडी शहराला मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार असून यामुळे हे शहर मेट्रोच्या माध्यमातून ठाणे आणि कल्याण शहराला जोडले जाणार आहे. या प्रकल्पांसाठी यंदा मोठय़ा निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या मेट्रो प्रकल्पांचा विस्तार करण्याचे नियोजन एमएमआरडीएकडून केले जात असून त्यासाठी निधी राखून ठेवला आहे. ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग, ठाणे खाडी किनारी मार्ग, घाटकोपर ते ठाणे पुर्व मुक्त मार्गाचे विस्तारिकरण, खारेगाव टोल नाका ते कळवा नाका बाह्यवळण रस्ता अशा प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद केली आहे.

जिल्ह्यातील प्रकल्प

 • मेट्रो प्रकल्प मार्ग ४ वडाळा – घाटकोपर – मुलुंड – ठाणे – कासारवडवली या प्रकल्पासाठी २०३४ कोटी ८३ लाख
 • मेट्रो प्रकल्प मार्ग ४ (अ)  कासारवडवली ते गायमुख या प्रकल्पासाठी १२६ कोटी
 • मेट्रो प्रकल्प मार्ग ५  ठाणे- भिवंडी – कल्याण यासाठी ५९१ कोटी २६ लाख
 • मेट्रो प्रकल्प मार्ग ९  दहिसर ते मिरा-भाईंदर व ७ (अ) अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  या प्रकल्पासाठी ५४२ कोटी
 • मेट्रो प्रकल्प मार्ग १० गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड)साठी ९६ कोटी
 • मेट्रो प्रकल्प मार्ग १२ कल्याण ते तळोजा या प्रकल्पासाठी १० कोटी
 • मेट्रो प्रकल्प मार्ग १३ घोडबंदर ते विरार या प्रकल्पासाठी २ कोटी
 • ठाणे ते बोरीवली सहा पदरी भुयारी मार्गासाठी १५० कोटी
 • ठाण्यातील आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग बांधकामासाठी २०० कोटी
 • ठाणे खाडी किनारा मार्गासाठी १०० कोटी
 • घाटकोपर ते ठाणेपर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी १५०  कोटी
 • आत्माराम पाटील चौक खारेगाव टोल नाका ते कळवा नाका रस्त्याच्या बांधकामासाठी १०० कोटी
 • तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ ठाणे -बेलापूर रस्ता ते एपीएमसी मार्केटपर्यंत रेल्वे ओलांडणी पुलाच्या बांधकामासाठी ५० कोटी
 • ठाणे शहरातील रायलादेवी तलावाचे संर्वधन आणि पुनरुज्जीवन तलाव परिसरात सार्वजनिक उपयोगी सुविधेची कामे करण्यासाठी ४० कोटी २८ लाख आणि प्रादेशिक स्तरावर जलस्त्रोतांचा विकास करण्यासाठी (सुर्या आणि काळू प्रकल्प) ९५५ कोटी रुपयांची तरतूद 
 • कांजुरमार्ग ते बदलापूर या मार्गाकरिता योग्य जलद परिवहन सेवेची अंमलबजावणीसाठी १ कोटी

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mmrda grace district provision funds road metro dam projects ysh

ताज्या बातम्या