शहरांच्या वेशींवरील गावांत विकासपेरणी

स्थानिक विकास केंद्रांच्या माध्यमातून शहराच्या वेशीवर असलेल्या मात्र ग्रामीण भागात मोडणाऱ्या गावांचा समावेश आहे.

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सात विकास केंद्रे, औद्योगिक क्षेत्रांची उभारणी

जयेश सामंत, सागर नरेकर, लोकसत्ता

ठाणे : महानगर क्षेत्रात पायाभूत सुविधांसोबतच औद्योगिक विकास होऊन त्याचा फायदा महानगर क्षेत्रातील ग्रामीण भागालाही व्हावा या संकल्पनेतून एमएमआरडीएने महानगर क्षेत्रातील शहरांच्या वेशीवर असलेल्या ग्रामीण भागात विकास केंद्रे प्रस्तावित केली आहेत. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये सात विकास केंद्रे, सात प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रे आणि नऊ स्थानिक विकास केंद्रांचा यात समावेश आहे. या केंद्रांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरवण्यासोबतच कौशल्य आणि रोजगार निर्मिती करण्याचा हेतूही एमएमआरडीएच्या आराखडय़ात व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आपल्या प्रादेशिक आराखडय़ात महानगर क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रे, विकास केंद्रे आणि स्थानिक विकास केंद्रे प्रस्तावित केली आहेत. शहरांच्या वेशीवर असलेल्या ग्रामीण भागांत समतोल विकास साधणे, महानगर क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे, अर्थव्यवस्थेला उत्तेजन देणे आणि उत्पादन वाढवणे असा या आराखडय़ातील उद्देश आहे. यात ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील सात ठिकाणी औद्योगिक क्षेत्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे दोन, विरार येथे एक, रायगड जिल्ह्यातील तळोजे, खोपोली, खोपटा आणि अंबा नदीलगतचा परिसर औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यातील वसई, ठाणे जिल्ह्यातील खारबाव, भिवंडी, निळजे आणि कल्याण, तसेच रायगड जिल्ह्यातील शेडुंग आणि पनवेल या ठिकाणी सुमारे ३५ चौरस किलोमीटर क्षेत्र विकास केंद्रांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. विरारमधील भूखंड वसई-विरार शहर महानगरपालिका, तळोजा नैना विशेष नियोजन क्षेत्रात, खोपोली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विशेष नियोजन क्षेत्रात, खोपटा सिडकोच्या विशेष नियोजन क्षेत्रात, भिवंडीतील भूखंड महानगरपालिका व विशेष नियोजनाच्या हद्दीच्या बाहेर आणि शेवटचा भूखंड हा अंबा नदीच्या दोन्ही बाजूस स्थित असून अंशत: नैना व उर्वरित भूखंड विशेष नियोजन क्षेत्राच्या हद्दीबाहेर समाविष्ट आहे.

औद्योगिक क्षेत्रे :

भिवंडी (ठाणे) – २, विरार (पालघर) – १, तळोजे, खोपोली, खोपटा, अंबा नदीलगतचा परिसर (रायगड जिल्हा) – प्रत्येकी एक

विकास केंद्रे :

वसई (पालघर जिल्हा), खारबाव, भिवंडी, निळजे, कल्याण (ठाणे जिल्हा), शेडुंग व पनवेल (रायगड )

सर्वागीण विकासाचे लक्ष्य

स्थानिक विकास केंद्रांच्या माध्यमातून शहराच्या वेशीवर असलेल्या मात्र ग्रामीण भागात मोडणाऱ्या गावांचा समावेश आहे. जवळच्या नागरी परिसरावर अवलंबून राहणाऱ्या या भागांमध्ये विकास करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. ही केंद्रे स्थानिक बाजार केंद्र म्हणून कार्यरत करण्याचा मानस आहे. स्थानिक गरजा, कौशल्याशी संबंधित आर्थिक विकास करणे, कौशल्य विकास करणे आणि शासनाच्या विविध योजनांचे एक केंद्र तयार करणे यांचा यात समावेश आहे.

विकासाची प्रक्रिया अशी..

* विकास केंद्र उभारणीसाठी लागणारी जमीन प्राधिकरणास हस्तांतर करण्यात येईल.

* केंद्रांच्या विकासासाठी एमएमआरडीए इमारत व अन्य पायाभूत सुविधांच्या उभारणीकरिता गुंतवणूक करेल.

* शासनातील संबंधित विभाग आणि एमएमआरडीएतील प्रतिनिधी यांची संयुक्त कार्यसमिती प्रत्येक केंद्रातील कार्ययोजनेची अंमलबजावणी करेल.

* जिल्हाधिकारी, ग्रामीण, आदिवासी विकास विभाग, कृषी आणि फलोत्पादन विभाग, शालेय शिक्षण व पर्यटन विभाग या विभागातून प्रकल्पांचे प्रतिनिधित्व होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mmrda proposed development centers in rural areas zws