कळवा, मुंब्य्रालाही ‘एमएमआरडीए’चा दिलासा

कळवा आणि मुंब्रा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तिसऱ्या खाडी पुलाची मार्गिका पटनी परिसरात उतरविण्याबरोबरच पर्यायी नवे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा प्रस्ताव

ठाणे : कळवा आणि मुंब्रा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तिसऱ्या खाडी पुलाची मार्गिका पटनी परिसरात उतरविण्याबरोबरच पर्यायी नवे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये खाडीपुलाच्या डाव्या बाजूला नवीन रस्ता तयार करून तो आत्माराम पाटील चौकापर्यंत नेणे, खारेगावातील ९० फुटी रोड रेतीबंदर रस्त्याला जोडणे, मुंब्रा पश्चिमेतून नवा रस्ता तयार करून तो मित्तल कंपाऊड भागातील रस्त्याला जोडणे अशा रस्त्यांचा समावेश आहे.

दरम्यान, ऐरोली आणि आनंदनगर मार्गावरून ये-जा करताना भरावा लागणारा पथकर चुकवण्यासाठी मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी या मार्गावरही पथकर सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.

कळवा आणि मुंब्रा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नव्या पर्यायी रस्त्यांचे प्रस्ताव एमएमआरडीएला सादर केले होते. या प्रस्तावांवर एमएमआरडीएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने चर्चा करण्यात आली असून या पर्यायी रस्त्यांची मंत्री आव्हाड आणि एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांनी गुरुवारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर मंत्री आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उपाययोजनांबरोबरच पर्यायी नव्या रस्त्यांची माहिती दिली. कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाची मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरणार आहे. परंतु विटावा रेल्वे पूल रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी कोंडी सुटण्याऐवजी वाढणार आहे. हा पूल पटनी मैदानाजवळ उतरविण्यात आल्यास वाहतूक कोंडीवर मात करणे सहजशक्य होणार आहे. त्यास एमएमआरडीए आयुक्तांनी मान्यता दिली आहे. तसेच कळवा पुलाच्या डाव्या बाजुला अस्तित्वात असलेल्या रस्त्याला-खारीगावला समांतर रस्ता बांधून तो आत्माराम पाटील चौकापर्यंत नेण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे कळवा चौकात येणाऱ्या इतर मार्गावरील कोंडी कमी करणे शक्य होणार आहे, अशी माहिती मंत्री आव्हाड यांनी दिली.

मुंबई-पुण्याला जोडणारा रस्ता पूर्वी मुंब्रा येथून जातो. वाशीपुलाच्या उभारणीनंतर पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून येणारी वाहतूक वळविण्यात आली. तरीही मुंब्य्रातून जाणाऱ्या रस्त्याला समांतर रस्ता नसल्याने मुंब्रा-कौसा भागात कोंडी दिवसेंदिवस कोंडी वाढतच आहे. त्यामुळे मुंब्रा पश्चिमेतील रस्ता बांधून तो चुहा ब्रिजकडून मित्तल ग्राऊंड आणि पुढे वाय जंक्शन आणि शिळ रस्त्याला जोडण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम भागातील वाहतूक विभागली जाऊन कोंडीची समस्या सुटेल, असा दावाही त्यांनी केला.

मफतलाल कंपनीची जमीन म्हाडाने विकत घ्यावी

मफतलाल कंपनीची संपूर्ण जमीन न्यायालयामार्फत विकत घेण्याची म्हाडाची तयारी आहे. त्यास न्यायालयाने मान्यता दिली, तर महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा निवासी संकुल प्रकल्प असेल. याठिकाणी २९ हजार घरे बांधणे शक्य होणार आहे. शिवाय, झोपडपट्टीही विकसित होईल. न्यायालयाने कामगार, बँक आणि सरकार असे तीन हिस्से करावेत. म्हाडा ही सरकारचीच संस्था असल्याने म्हाडा आणि सरकारचे देणे म्हाडा देईल. कामगारांची देणी म्हाडा तत्काळ देईल. बँकेचा प्रश्न समझोत्याने निकाली काढता येईल. या संदर्भात अ‍ॅडव्होकेट जनरल कुंभकोणींशी चर्चा झाली असून तसा प्रस्ताव ते न्यायालयात मांडणार आहेत. त्यातून कळव्याचा चेहरामोहराच बदलणार आहे.

बावळण रस्त्यावर टोल

मुंब्रा बाह्यवळण रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. ठाणे आणि नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या दोन मार्गावरील टोल वाचविण्यासाठी अनेक अवजड वाहनचालक मुंब्रा बाह्यवळण मार्गाचा वापर करीत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने रस्ते खराब होण्याबरोबरच वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी पथकर सुरू केला तर पथकर वाचविण्यासाठी या मार्गाने अवजड वाहतूक करण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच तेथील रस्त्याची दुरवस्था होणार नाही. यासाठी आपण मागील सरकारकडेही मागणी केली होती. आता अशोक चव्हाण यांनी त्यास मान्यता दिली आहे. टोल बसविल्याने आता रस्त्यावरील भार कमी होऊन रस्ता सुस्थितीमध्ये राहील, असे मंत्री आव्हाड यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mmrda relief mumbai too ysh

ताज्या बातम्या