डोंबिवली : गेल्या महिनाभरापासून डोंंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या लोकमान्य टिळक रस्त्याच्या सीमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार म्हणून एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू होते. पण, नवरात्रोत्सव, दिवाळी सणांच्या काळात हा रस्ता बंद राहिला तर शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होईल म्हणून हे काम दिवाळीनंतर करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. अखेर गेल्या दोन दिवसांपासून टिळक रस्त्याच्या डाव्या बाजूचे काँक्रिटीकरणासाठीचे खोदकाम ठेकेदाराने सुरू केले आहे.

टिळक रस्ता यापूर्वी टिळक पुतळा, सुयोग सभागृह, सर्वेश सभागृह, ब्राह्मण सभा ते फडके रस्ता दरम्यान सीमेंट काँक्रीट रस्त्यासाठी बंद करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले होते. परंतु, या रस्त्याच्या दोन्ही मार्गिका एकदम बंद केल्या तर परिसरातील अरूंद रस्त्यांवर आणि भागात रस्ते काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी होईल. डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा आणि रेल्वे स्थानकाकडून एमआयडीसी, रिजन्सी गृहसंकुल, गोळवली, पाथर्ली, ग्रामीण भागाकडे जाणारा टिळक रस्ता हा मध्यवर्ति मार्ग आहे. बहुतांशी वाहने या रस्त्यावरून धावतात.

हा रस्ता एकदम बंद करू नये म्हणून वाहतूक विभागाने काही सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यामुळे एमएमआरडीएने टिळक रस्त्याची एक बाजुची मार्गिका सिमेंट काँक्रिटची पूर्ण करून मग दुसऱ्या बाजू करण्याचे नियोजन केले आहे. बापूसाहेब फडके रस्त्याकडून ब्राह्मण सभा दिशेने जाणाऱ्या उजव्या मार्गिकेतील बाजू ठेकेदाराने खोदकामासाठी आणि गटार कामासाठी बंद करण्यास सुरूवात केली आहे. या कामामुळे फडके रस्त्यावरून टिळक पुतळ्याकडे जाणारी वाहतूक एक मार्गिकेतून सुरू राहील.

टिळक पुतळ्याकडून फडके रोडकडे येणारी वाहतूक चार रस्त्यावरून किंवा सर्वेश सभागृह येथून रेल्वे स्थानकाकडे रस्ता पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे. तीन ते चार टप्प्यात हा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वेश सभागृह ते टिळक पुतळा रस्ता दरम्यान काम सुरू झाले की मग रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहतूक चार रस्ता, मानपाडा रस्ता, शिवसेना मध्यवर्ति शाखेकडून रेल्वे स्थानकाकडे होणार आहे.

या रस्ते कामाच्यावेळी कोणत्याही प्रकारची कोंडी परिसरातील रस्त्यांवर होणार नाही यासाठी डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी नियोजन केले आहे. परिसरातील रस्त्यांवर दिवसभर, रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात असणार आहेत.

धुळीचे लोट

लोकमान्य टिळक रस्त्याची खड्डयांमुळे चाळण झाली आहे. या रस्त्यावर डांबराचा थर राहिला नसल्याने सततच्या वर्दळीने धुळीचे लोट या भागात पसरतात. परिसरातील दुकाने, घरांमध्ये धूळ उडत असल्याने नागरिकांनी घराच्या खिडक्या बंद करणे पसंत केले आहे. या रस्त्यावरील दुकानदार दुकानातील सामान धुळीने खराब होत असल्याने हैराण आहेत.