scorecardresearch

डोंबिवली : ठाकुर्लीत खड्ड्यांमध्ये बसून मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन ; रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी

ठाकुर्ली चोळे गावातील खड्डेमय रस्त्यांमुळे या भागात सतत वाहन कोंडी होते.

डोंबिवली : ठाकुर्लीत खड्ड्यांमध्ये बसून मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन ; रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी
डोंबिवली : ठाकुर्लीत खड्ड्यांमध्ये बसून मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन ; रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी

गेल्या तीन महिन्यांपासून ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानका जवळील हनुमान मंदिर-चोळे गाव रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे या भागात सतत वाहन कोंडी, शालेय बस, विद्यार्थ्यांना या खड्डे, कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. या रस्त्याचे लवकर काँक्रिटीकरणाचे काम सुरू करावे, या मागणीसाठी मनसेच्या या भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी खड्ड्यात बसून आंदोलन केले. तसेच स्वाक्षरी मोहीम राबवून या गंभीर विषयाकडे पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता सपना कोळी यांचे लक्ष वेधले.

ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानका जवळील रस्त्यावरुन डोंबिवलीतील सर्व प्रकारची वाहने चोळे गावातील हनुमान मंदिर रस्त्यावरुन म्हसोबा चौक, ९० फुटी रस्त्याने कल्याणकडे जातात. कल्याण कडून सर्व प्रकारची वाहने याच रस्त्याने डोंबिवलीत येतात. ९० फुटी भागातील रहिवाशांना स्थानकाकडे येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. याशिवाय डोंबिवली एमआयडीसी, चोळे, सारस्वत काॅलनी, पेंडेसनगर भागातील नागरिक रिक्षेने, दुचाकीने ठाकुर्ली रेल्वे स्थानकात येऊन प्रवास करतात.वाढती वाहन संख्या आणि अरुंद रस्ता अशी परिस्थिती चोळे हनुमान मंदिरा जवळ आहे. या तिठ्यावर एकाच वेळी अवजड, शालेय, प्रवासी बस समोरा समोर आल्या की या १० फुटी अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने आहेत. तेथे खरेदीदारांची वाहने उभी असतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते.

हेही वाचा : कल्याण : मनसे विद्यार्थी सेनेच्या विभागीय अध्यक्षावर हल्ला ; चार जणांवर गुन्हा दाखल

या सततच्या वाहनांमुळे ठाकुर्ली चोळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गेल्या महिन्यापूर्वी या रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे या मागणीसाठी मनसेचे ठाकुर्ली चोळे विभागाचे अध्यक्ष प्रदीप चौधरी, शारदा चौधरी यांनी या भागात स्वाक्षरी मोहीम राबवून पालिकेचे या खड्डे प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी लवकरच हे रस्ते सुस्थितीत करुन दिले जातील असे आश्वासन दिले होते. आता दोन महिने उलटले तरी या रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने आणि केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याने तो मुसळधार पावसात वाहून गेला. त्याच्या निषेधार्थ चौधरी दाम्पत्याने मंगळवारी सकाळी ठाकुर्ली हनुमान मंदिर जवळील रस्त्यावर खड्ड्यात बसून आंदोलन केले. या आंदोलनात मनसे कार्यकर्ते, रिक्षा चालक, परिसरातील रहिवासी सहभागी झाले होते. पालिका अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

हेही वाचा : ठाणे : सत्यनारायण पूजेला बसण्यास रोखल्याने केला चाकूने वार

लवकरच ठाकुर्लीतील रस्ते सुस्थितीत केले नाहीतर या रस्त्यांवर मनसेतर्फे बेमुदत आंदोलन केले जाणार आहे, असे विभाग अध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी सांगितले. सोमवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांना स्मार्ट सिटी, शहरातील खड्डे, बकालपणावरुन खडे बोल सुनावल्याने आता नागरिकही पालिके विरुध्द आक्रमक झाले आहेत.पालिकेतील एक बांधकाम विभागातील एक वरिष्ठ अधिकारी स्थानिक अधिकाऱ्यांना मी आदेश देत नाही तोपर्यंत खड्डयांसाठी डांबरीकरणाचा वापर करू नका असा दबाव टाकत असल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची खड्डे भरण्यासाठी मोठी अडचण होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या चर्चेतून समजते. या अधिकाऱ्याची सोमवारी केंद्रीय मंत्री येऊन गेल्यानंतर सार्वजनिकबांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चांगलीच खरडपट्टी काढली असल्याचे समजते.या आंदोलनात डोंबिवलीचे विधानसभा सचिव उदय वेळासकर, शहर संघटक स्मिता भणगे, अजय कोंडे, संजय साळवी, विजय मिश्रा, नीलेश मालप, राजेंद्र नेतकर, लक्ष्मण चौधरी, महेश कारवा, मनोहर पाटील, पार्वती जोशी, ज्योती जाधव, कल्पना राणे, वर्षा शिंदे, पवित्रा पुजारी हे मनसे कार्यकर्ते, रिक्षा संघटना पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा : कल्याण : वन विभागातर्फे कार्यालय आवारात पर्जन्य जलसंचयन प्रकल्प ; दरवर्षी तीन लाख लीटर पाणी साठ्याचे नियोजन

ठाकुर्ली चोळे गावातील खड्डेमय रस्त्यांमुळे या भागात सतत वाहन कोंडी होते. प्रवाशांना ठाकुर्ली रेल्वे स्थानकात वेळेत पोहचता येत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर होतो. त्यामुळे पालिकेने कोणतेही कारण न देता या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे. – प्रदीप चौधरी विभाग अध्यक्ष मनसे, ठाकुर्ल

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns activists protest by sitting in pits in thakurli demand for road concretization dombivali tmb 01

ताज्या बातम्या