मागील तीन दिवस ठाण्यात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वच ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकुन पडावे लागत आहे. ही दरवर्षीचीच समस्या आहे. त्यामुळे, ठाण्याला मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असा संताप मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे. ठाणेकरांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे असुन यावेळी तरी विचार करून निर्णय घ्या,असे असेही त्यांनी म्हटले आहे.

संपूर्ण जून महिना कोरडा गेला आणि ३० जूनपासून सुरू झालेल्या पावसाने प्रशासनाच्या नियोजनाचे पितळ उघडे पाडले. गेले तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे पूर्वद्रुतगती महामार्गासह मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर तसेच, माजीवडा जंक्शन आणि घोडबंदर रस्त्यासह कल्याण आणि नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा फटका शुक्रवारी दुपारी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर निघालेल्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनाही बसला. ठाणे महापालिका मुख्यालयाजवळुन वसईकडे जाण्यासाठी निघालेले जाधव हे तब्बल अर्धातास विवियाना मॉल जवळील परिसरात अडकुन पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या जाधव यांनी प्रशासनासह सरकारवर ताशेरे ओढले.

विद्यार्थ्याना आणि रुग्णवाहिकाना देखील अडकून पडावे लागते –

“ या वाहतुक कोंडीचा फटका शहरातील रुग्णवाहिका,शाळेच्या वाहनांना बसत असुन वाहने तासंतास कोंडीमध्ये अडकुन पडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापर्यत वाहनांच्या रांगा लागत आहेत. सेवा रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर संबधित प्राधिकरणाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र या वाहतूक कोंडीचा फटका नोकरदार वर्गासह नागरीकांना बसत आहे. घोडबंदर परिसरात राहणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्याना आणि रुग्णवाहिकाना देखील तासन तास अडकून पडावे लागत आहे. खड्डे बुजवण्यात तसेच वाहतूक कोंडी दूर करण्यात वाहतूक विभाग आणि प्रशासन कमी पडत आहे.”, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.

…अन्यथा या समस्या कायम राहतील –

तसेच, “दरवर्षी प्रमाणे यंदाही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाचे आगमन यंदा उशिरा झाल्याने या कालावधीत उत्तम नियोजन केले गेले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे. ठाण्यात कितीतरी आमदार आहेत, त्या आमदारांना मंत्रीपदे दिली तरी सुद्धा समस्या अजून सुटली नाही. सर्वसामान्य नागरीक कर भरतो, त्याचाही विचार केला जात नाही. मुख्यमंत्रीच काय तर ठाण्याला पंतप्रधान पद दिले तरी ही समस्या तशीच राहणार आहे.”, असा संताप जाधव यांनी व्यक्त केला आहे. ठाणेकरांमध्ये जागरूकता यायला हवी तरच सुधारणा होतील, अन्यथा या समस्या कायम राहतील. यापुढे मतदान करताना विचार करा.”, असेही त्यांनी म्हटले आहे.