डोंबिवली – मागील पंधरा दिवसापूर्वी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत एकता सावंत या हरहुन्नरी मराठी तरूणीने शोरमा विक्रीची हातगाडी लावली होती. ही हातगाडी नियमबाह्यपणे लावली म्हणून पालिकेच्या पथकाने या हातगाडीवर कारवाई केली होती. या मराठी तरूणीच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहील आणि तिला येथे शोरमा विक्री व्यवसाय करण्यास कोण विरोध करतो ते आम्ही पाहून घेऊ, असा इशारा देत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ‘बाहेरचे येऊन रेल्वे स्थानक भागात धंदा करत असतील आणि मराठी तरूणीवर येथे व्यवसाय करून दिला जात नसेल तर ते मनसे ते अजिबात सहन करणार नाही,’ असे स्पष्ट शब्दात पालिका प्रशासनाला बजावले.

पालिकेकडून डोंबिवली रेल्वे स्थानक भागात बसणाऱ्या फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशावरून रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव आहे. त्यामुळे पालिकेकडून दीडशे मीटरच्या आतील फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जाते. दीडशे मीटरच्या आत एकता सावंत या तरूणीने स्कायवाॅकखाली शोरमा विक्रीचा व्यवसाय भाड्याने हातगाडी घेऊन सुरू केला होता. ही हातगाडी नियमबाह्यपणे दीडशे मीटरच्या आत लावली म्हणून पालिका पथकाने त्या हातगाडीवर कारवाई करून तेथे व्यवसाय करण्यास सावंत यांना विरोध केला.

मनसेची धाव

रेल्वे स्थानक भागात अनेक परप्रांतीय आणि इतर फेरीवाले दररोज व्यवसाय करतात. ते रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरची मर्यादा पाळत नाहीत. त्यांना दीडशे मीटरच्या आत व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाते. मग माझ्या सारख्या मराठी तरूणीवर हा अन्याय का केला जात आहे, असा प्रश्न करत एकता सावंत यांनी एक चलतचित्र मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना वीस दिवसापूर्वी पाठविले होते. या चलतचित्राची दखल घेत राज ठाकरे यांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना डोंबिवली रेल्वे स्थानक भागात पाठवून पीडित सावंतला न्याय देण्यास. या तरूणीच्या हातगाडीवर पालिकेकडून कारवाई होता कामा नये यादृष्टीने प्रयत्न करण्यास सांगितले होते.

त्याप्रमाणे पंधरा दिवसापूर्वी जाधव डोंबिवलीत येऊन सावंत यांच्याशी चर्चा करून तुम्हाला रेल्वे स्थानक भागात शोरमा विक्रीसाठी परवानगी दिली जाईल. पालिकेच्या पहिल्या महासभेत तुमचा विषय आपण मंजूर करून घेऊ, असे आश्वासन दिले होते. राजकीय हस्तक्षेपामुळे पालिकेने याप्रकरणापासून दूर राहणे पसंत केले होते.

शोरमा विक्री सुरू

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे एकता सावंत यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत बुधवारी नवीकोरी हातगाडी लावली. तेथे दणक्यात शोरमा विक्री व्यवसाय सुरू केला. या खाद्यान्न उपक्रमाचे उदघाटन नेते जाधव यांच्या हस्ते पार पडले. शहरप्रमुख राहुल कामत यावेळी उपस्थित होते. आम्ही दिलेला शब्द पाळतो. त्याप्रमाणे सावंत यांनी आहे त्याच जागी व्यवसाय सुरू केला आहे. पालिकेला या हातगाडीवर कारवाई करायची असेल तर मनसे २०१७ पासून रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांवर कारवाई करा म्हणून ओरडत आहे. त्याची कधीच कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे मनसेच्या त्या मागणीप्रमाणे सरसकट सर्व फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई सुरू करावी. एकट्या दुकट्यावर विशेषता मराठी तरूणीच्या तरूणीवर हातगाडीवर कारवाई केली तर मात्र ते अजिबात सहन केले जाणार नाही, असे जाधव यांनी सांगितले.

खूप आनंद

मनसेचे नेते राज ठाकरे व्यस्त असल्याने ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. पण या प्रकरणात आणि आपल्यावर झालेल्या अन्यायबाबत आपणास न्याय देण्यासाठी मनसेचे नेते राज ठाकरे, अविनाश जाधव यांनी मोलाची मदत केली. मराठी माणसांनी व्यवसाय आपण त्यांच्या पाठशी आहोत, हे जाधव यांचे वक्तव्य आहे.त्यामुळे हा व्यवसाय करण्यास आपणास बळ मिळाले. त्यांची आपणास मोलाची मदत झाली, अशी भावना शोरमा विक्री व्यावसायिक एकता सावंत यांनी व्यक्त केली.

ऱ्फोटो ओळ डोंबिवलीत शोरमा विक्रीचे हातगाडीचे उद्घाटन करताना मनसेचे नेते

अविनाश जाधव.