कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात मंदिराच्या बांधकामावर कारवाई केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना शिवीगाळ करत मारहाण केल्यानंतर आता या प्रकरणात मनसेने उडी घेतलीय. अश्चर्याची गोष्ट म्हणजे मनसेचे एकमेव आमदार असणाऱ्या राजू पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची बाजू घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याणनजीक असलेल्या मोहने परिसरातील जुन्या गावदेवी मंदिर जीर्ण झाल्याने त्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी स्थानिकांनी मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु केले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या बांधकामाला बेकायदेशीर ठरवीत कारवाई केली. या कारवाई विरेाधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी प्रभाग कार्यालयात पा्ेहचून सहाय्यक आयुक्त सावंत यांच्या कानशीलात लगावली.या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मुकंद कोट यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे. मनसे आमदार राजू पाटील हे घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी कारवाई करण्यात आलेल्या मंदिरात पोहचले. गावकऱ्यांशी त्यांनी या विषयावर चर्चा केली.

…तर उद्रेक होणारच
“हे अधिकारी आणि त्यांचे आका हे हिंदूत्व विसरले आहेत. हिंदू ह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित् गावातील मंदिरावर कारवाई झाली. सर्रासपणे अनधिकृत बांधकामे सुरु आहे. ते अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली आहे. त्या अधिकाऱ्याने संपूर्ण गावाची आणि समाजाची माफी मागावी. नंतर आम्ही त्यांना कुठे बेकायदा बांधकाम सुरु आहे हे दाखवू,” असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच अनधिकृत बांधकामे सोडून मंदिरावर कारवाई करणार तर उद्रेक होणारच असा सज्जड इशारा पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.

प्रकरण काय?
बुधवारी म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली .धक्कादायक बाब म्हणजे प्रभाग क्षेत्र कार्यलयाबाहेरच ही घटना घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्तांना मारहाण करणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकुंद कोट यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आलीय. महानगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईदरम्यान केडीएमसी अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत असून कारवाई दरम्यान सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आता अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून जोर धरू लागली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू आहे. बुधवारी सहाय्यक आयुक्त, अ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या पथकाने पथक मोहने परिसरात बांधकाम सुरु असलेल्या मंदिराच्या चौथऱ्यावर कारवाई केली होती.

कारवाईनंतर काय घडलं?
कारवाईनंतर सावंत व त्याचे पथक कार्यलयात पोहचले. मात्र त्यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक मुकुंद कोटदेखील काहीजणांसोबत कार्यालयात आले आणि वाद घालू लागले. मुकुंद यांनी कार्यलयाबाहेर राजेश सावंत यांना गाठत त्यांना मंदिरावर कारवाईबाबत जाब विचारत शिवीगाळ केला. नंतर सावंत यांनी मारहाणही करण्यात आली. मुकुंद कोट यांनी सावंत यांना कानशीलात लगावली. याप्रकरणी सावंत यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात कोट आणि त्यांच्या १५ सहकाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla raju patil support former shiv sena corporator booked for assaulting senior kdmc official for demolishing temple foundation in kalyan scsg
First published on: 19-11-2021 at 08:20 IST