अंबरनाथमधील रेमडेसिविर चोरी प्रकरणाला धक्कादायक वळण

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील पालिकेच्या दंत महाविद्यालयातून रेमडेसिविर इंजेक्शन चोरी करून ते काळाबाजारात विकण्याचा प्रकार अंबरनाथ मनसे पदाधिकाऱ्यांसह दोघांनी काही दिवसांपूर्वी उघडकीस आणला होता. मात्र आता हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांसह दोघांचा या प्रकरणात सहआरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. दंत महाविद्यालयाची बदनामी करण्यासाठी कट रचणे, दुखापत पोहोचवणे, खंडणीसाठी भीती घालणे अशा गंभीर कलमांचा समावेश या प्रकरणाचे तपास अधिकारी यांनी प्रथम वर्ग दंडाधिकारी यांना सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

अंबरनाथ नगरपालिका संचालित दंत महाविद्यलयातील कोविड रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन चोरी करून ते चढय़ा दराने काळ्याबाजारात विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णवाहिकेचा चालक कुणाल भंडारी याच्याविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दंत महाविद्यालयाची नाहक बदनामी झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती. या गुन्ह्यची चौकशी करत असताना हे इंजेक्शन आरोपी कुणाल भंडारी याने त्याची मैत्रीण विशाखा गायकवाड हिच्याकडून घेऊन ते नंदकुमार सकट याच्यामार्फत दिलीप सहस्रबुद्धे या व्यक्तीला विकताना पकडले गेले. या विक्रीची माहिती बाळकृष्ण गोडसे यांना मिळालेली होती. ही माहिती गोडसे यांनी अंबरनाथ मनसे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांना देत सापळा रचण्याचा कट रचला असे अंबरनाथ पोलीस ठाण्याकडून प्रथम वर्ग दंडाधिकारी यांना सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. कुणाल भोईर, बाळकृष्ण गोडसे आणि इतर तिघांनी आरोपी कुणाल भंडारी याला एका चारचाकी गाडीत बसवून सूर्योदय नगरच्या प्रवेशद्वाराहून दंत महाविद्यालयाकडे नेले. यावेळी भंडारी याला मारहाण करत २ लाखांची खंडणी मागितली गेली. ती देण्यास असमर्थता दर्शवली असता नोडल अधिकारी डॉ. नितीन राठोड, डॉ. अतुल मुंडे यांच्याकडून हे इंजेक्शन आले आहे असे माध्यमांसमोर सांग अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच हे इंजेक्शन दंत महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयातील नसल्याचेही या अहवालात नमूद केले आहे. मात्र रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असून त्याचे पुरावेही आहेत, असेही तपास अधिकारी यांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुखापत पोहोचवणे, खंडणी मागण्यासाठी भीती घालणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश करून या गुन्ह्यत मनसे शहर अध्यक्ष कुणाल भोईर, बाळकृष्ण गोडसे आणि दिलीप सहस्रबुद्धे यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. यातील उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली आहे. या अहवालानंतर रेमडेसिविर चोरी प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असल्याचे दिसून येते आहे.