मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा दावा करणाऱ्या तसेच परप्रांतीयांविरोधात आंदोलन करत राजकारणाची सुरूवात केलेल्या मनसेने आता हिंदूत्त्वाचा मुद्दा जवळ केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील पाचपाखाडी भागात ‘मुबंई मे बैठा हिंदूओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा’ अशा आशयाचे फलक उभारले आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर उडी घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

२००६ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात मनसेने अनेक चढउतार पाहिले. २००८ मध्ये परप्रांतियांमुळे मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नसल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उत्तरभारतीयांना लक्ष्य करण्यास सुरूवात केले होते. त्यानंतर रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या आंदोलनाची चर्चा संपूर्ण देशभर सुरू होती. तसेच राज ठाकरे यांच्या भाषण शैलीची अनेक मराठी तरुणांना भूरळ पडली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनसेमध्ये सभासद नोंदणी झाली. तसेच मुंबईत मनसेचे आमदारही निवडून आले होते.

गेल्या काही वर्षांपासून मनसे हिंदूत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांवर टिका करत आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशीही राज ठाकरे यांनी मशीदीच्या भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मंगळवारी राज ठाकरे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी मनसेने ठिकठिकाणी फलकबाजी करण्यास सुरूवात केली आहे. ठाण्यातील विभागाध्यक्ष महेश कदम यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ हिंदी भाषेमध्ये एक फलक उभारले आहे. या फलकामध्ये त्यांनी प्रामुख्याने मराठी ऐवजी हिंदूओ का राजा असा राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.

मुंबई में बैठा है हिंदूओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा… असा आशय या फलकावर लिहीलेला आहे. त्यामुळे आता मनसे मराठीवरून हिंदूत्वाच्या मुद्द्यावर उडी घेत असल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे.