ठाणे: इथेनॉल इंधनाबाबत वाहनधारकांच्या मनातील प्रश्न आणि वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप करत, इथेनॉल धोरणामुळे शेतकऱ्यांपेक्षा कंपन्या आणि गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीलाच अधिक फायदा झाल्याचा दावा केला. तसेच इथेनॉलमुळे वाहनांचे इंजिन, मायलेज आणि ग्राहकांवर आर्थिक भार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय केंद्र सरकारने इंधनाची आयात कमी करणे, प्रदूषण घटवणे आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने घेतला आहे. मात्र, इथेनॉलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते, इंजिनवर परिणाम होतो आणि ग्राहकांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडतो, असा आरोप अनेक वाहनचालक आणि विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या मुद्द्यावरून मनसेने राज्यभर आंदोलन सुरू केले असून, त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी बुधवारी ठाण्यातील तीन पेट्रोल पंपांवर आंदोलन केले.
यावेळी मनसे नेते जाधव म्हणाले, काही वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांनी इथेनॉलमुळे देशातील पेट्रोलचे दर निम्म्यापर्यंत कमी होतील, असे आश्वासन दिले होते. मात्र आजही देशातील पेट्रोलचे दर सर्वाधिक असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. इथेनॉल मिश्रणामुळे अनेक वाहनांच्या इंजिनवर परिणाम झाला असून, वाहनांचे मायलेज कमी झाल्याचे स्वतः अधिकारीही मान्य करतात, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्याचा थेट आर्थिक फटका ग्राहकांनाच बसत असल्याचे ते म्हणाले.
पेट्रोल पंपांवरील यंत्रणांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांचाही खर्च अखेरीस ग्राहकांवरच पडणार असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना इथेनॉलमुळे विशेष आर्थिक लाभ झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगत, ऊस पूर्वीप्रमाणेच साखर कारखान्यांमध्ये जात होता आणि आता इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांना फायदा झाला असला तरी शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मिळालेला नाही, असा दावा जाधव यांनी केला.
या संपूर्ण धोरणाचा फायदा दोनच घटकांना झाला आहे. एक म्हणजे संबंधित कंपन्या आणि दुसरे म्हणजे नितीन गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीला, असा आरोपही त्यांनी केला. सरकारने इथेनॉलऐवजी इलेक्ट्रिक वाहने आणि सौरऊर्जेला अधिक प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी करत जाधव म्हणाले की, सौरऊर्जेमुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही, लोकांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतात आणि वाहनांच्या वापराचाही खर्च कमी होऊ शकतो. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांनी यापूर्वी केलेल्या ‘पाण्यावर चालणारी वाहने’ आणि ‘उडणाऱ्या गाड्या’ यांसारख्या वक्तव्यांचाही उल्लेख करत त्यावर टीका केली. इथेनॉल धोरणाविरोधात मनसेने सुरू केलेले आंदोलन पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
