ठाणे : रेल्वे विभागाने २००८ मध्ये भरती प्रक्रिया राबवली होती. या भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मनसेकडून मारहाण केल्याच्या आरोपावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज ठाकरे यांनी न्यायालयात उपस्थित राहून गुन्हा मान्य नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाकडून आता हा खटला पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणूका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागले आहेत. त्यात युती आणि आघाडी होणार की नाही याविषयी चर्चा रंगल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आले असून हे दोघे एकत्र निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात गुरुवारी हजेरी लावली.
काय होते प्रकरण?
अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाने १९ ऑक्टोबर २००८ रोजी, रेल्वे भरतीसाठी परीक्षा आयोजित केली होती. मुंबईत रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. रेल्वे भरतीमध्ये उत्तर भारतीयांना प्राधान्य दिले जात असून रेल्वे भरतीत स्थानिकांवर अन्याय होत आहे, असा मनसेचा आरोप होता. यानंतर हिंसाचार वाढला आणि या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होती.
राज यांची न्यायालयात हजेरी
ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर गुरुवारी या मारहाण प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली. राज ठाकरे यांची बाजू मांडण्यासाठी ऍड. ओंकार राजूरकर, ऍड. आदित्य शिरोडकर, ऍड. मंदार लोणारे असे वकील उपस्थित होते.
न्यायालयात काय घडले?
रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपावरून दाखल असलेला गुन्हा मान्य आहे का, असा प्रश्न न्यायाधीश कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर हा गुन्हा मान्य नसल्याचे राज यांनी सांगितले. त्यामुळे चार्ज फ्रेम करण्यासाठी ही सुनावणी होती. परंतु राज यांनी गुन्हा मान्य नसल्याचे सांगितल्याने आता हा खटला पुढे चालविला जाणार असून त्याची तारीख लवकरच कळेल, अशी माहिती ऍड ओंकार राजूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
