गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दादारमधील शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या मेळाव्यामधील राज ठाकरेंचं भाषण सध्या राज्यामधील राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. राज ठाकरेंनी या भाषणामधून हिंदुत्ववादी भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. या सभेतील मुद्द्यांवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आज राज ठाकरेंच्या पक्षातील दोन महत्वाच्या नेत्यांनी म्हणजेच संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या नवीन घराच्या बाहेरुन फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज यांच्या पुढील सभेची घोषणा केलीय.
नक्की वाचा >> “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते; ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…”; संजय राऊतांना मनसेचा खोचक टोला
‘शीवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या नव्या घरासमोरुन फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी, “राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक क्रिया, प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. काही लोकांना मिर्च्या झोंबल्याचं बघायला मिळाल्या,” असं म्हटलं आहे. पुढे बोलताना देशपांडे यांनी, “ठाण्यामध्ये ९ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. गडकरी रंगायतनसमोर ही सभा होणार आहे,” असंही सांगितलं.
देशपांडे यांनी या सभेमध्ये राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेनंतर उपस्थित राहिलेल्या प्रश्नांना उत्तरं देणार असल्याचं म्हटलंय. “एखादी मोठी पूजा होते तेव्हा तिची सांगता उत्तरपूजेने केली जाते. एखाद्याची आपल्याला उत्तर क्रिया सुद्धा करावी लागते. काही लोकांना आपल्याला उत्तरं सुद्धा द्यावी लागतात. ही सभा नक्की कशासाठी आहे याचं उत्तर ९ तारखेला राज ठाकरेच देतील,” असं देशपांडे यांनी म्हटलंय.
नक्की वाचा >> “बाळासाहेब, आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून…”; मनसेची शिवसेना भवनासमोरच बॅनरबाजी
तर पुढे बोलताना अविनाश जाधव यांनी, “जशी शिवतीर्थावर गर्दी जमलेली तशीच गर्दी ठाण्यातील सभेसाठी असेल,” अशी अपेक्षा व्यक्त केलीय. त्याचप्रमाणे जाधव यांनी, “ठाणे जिल्ह्याचा मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून मी सर्वांना या सभेसाठी निमंत्रित करतो,” असं म्हणत कार्यकर्त्यांना सभेला येण्याचं आवाहन केलं आहे. रामनवमीच्या पूर्वसंख्येला ही सभा होणार आहे. “राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी आणि शिवतीर्थावरील सभेनंतर जे प्रश्न उभे राहिलेत त्याची उत्तर ऐकण्यासाठी या सभेला नक्की या,” असं जाधव म्हणालेत.
नक्की वाचा >> पुण्यातील मनसे शहराध्यक्षांचा राज यांना घरचा आहेर; भोंगे लावण्यास नकार देत म्हणाले, “राजसाहेबांचं भाषण कळलंच नाही, आम्ही…”
ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोर असलेल्या रस्त्यावर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अर्ज दिला होता. मात्र त्याला आज सकाळपर्यंत परवानगी देण्यात आलेली नव्हती. पण आता मनसेच्या दोन प्रमुख नेत्यांनी ही सभा होणार असल्याचं स्पष्ट केलंय. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होण्याची शक्यता, ज्या ठिकाणी सभा आयोजित करण्याचा विचार आहे ते ठिकाण, त्यामुळे निर्माण होणारी वाहतुकीसंदर्भातील समस्या, ठाण्यातील राजकीय संघर्ष या सर्व गोष्टींचा विचार करता राज यांच्या या सभेला मोठा पोलीस बंदोबस्त असण्याची शक्यता आहे.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…
राज यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज यांच्या ९ तारखेच्या नियोजित सभेवरुन ठाण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये तुफान चर्चा रंगलीय. ठाण्यामध्ये आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयाची लढाई सुरु असताना दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये राज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.