कल्याण – भाजपचा डोंबिवलीतील लहान भाऊ मनसेचे माजी शहराध्यक्ष ॲड. मनोज घरत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनसेतील लहान भाऊ भाजपमध्ये आला. आता लवकरच मोठा भाऊ पण येईल, असे विधान करून राजकीय संभ्रम निर्माण केला होता. हा मोठा भाऊ कोण अशी चर्चा सुरू असतानाच, मनसेचे नेते राजू पाटील यांनी माध्यमांना सांगितले, मनसेचा मी निष्ठावान सक्रिय कार्यकर्ता आहे. माझी पक्षनिष्ठा मैत्री, दमबाजी आणि पैशानेही कोणी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे आपला कोठे जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केलेल्या विधानावर पडदा टाकला.
मनसेचे नेते राजू पाटील यांनी माध्यमांना सांगितले, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे माझे १९९४ पासुनचे घनिष्ठ मित्र आहेत. रवींद्र चव्हाण यांचे अनेक मित्र आहेत. त्यावेळचे त्यांचे काही मित्र खूप मोठे झाले. आताचेही खूप मोठे झाले. त्यावेळी काही मित्रांचा एन्काऊंटरही झाला. त्यामुळे त्यांच्या अनेक मित्रांविषयी प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे मोठा भाऊ विषय घेऊन बोलले आहेत. त्यामुळे ते नक्की कोणत्या मित्रा विषयी बोलले आहेत याची आपणास अजिबात कल्पना नाही.
मी मनसेचा निष्ठावान सक्रिय कार्यकर्ता आहे. मनसे माझ्या नसानसात आहे. माझ्या पक्षनिष्ठेबद्दल कोणी शंकाही घेऊ शकत नाही. माझी पक्षनिष्ठा कोणी दमबाजी करून, कोणी पैसा देऊन किंवा मैत्री करूनही विकत घेऊ शकत नाही. ती अचल आहे. मनसेचा मोठा भाऊ पण लवकरच भाजपमध्ये येईल, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. पण ते नक्की कोणाविषयी, कोणत्या भावाविषयी बोलले आहेत याची आपणास माहिती नाही. ज्या दिवशी ते आपले नाव घेऊन स्पष्ट बोलतील त्या दिवशी मी त्यांना माझ्या शब्द आणि भाषेत उत्तर देण्यास समर्थ आहे, असे सांगून रवींद्र चव्हाण बोलत असलेला मोठा भाऊ मी नाही असे स्पष्ट करून निर्माण झालेल्या संभ्रमाव्यवस्थेला पूर्णविराम दिला.
लोकांनो रस्त्यावर उतरा
अनेक वर्ष डोंबिवलीत पालिका, लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुका होत असतात. पण या निवडणुकांमध्ये कधी रक्तरंजित राडा कधी कोणी पाहिला नाही. सुनीलनगर भागात मित्र म्हणून मिरवणाऱ्या मैत्रीपूर्ण लढत करणाऱ्या युतीमधील दोन पक्षांमध्ये पैसे वाटप विषयावरून आणि त्यानंतर जीवघेणा हल्ला करण्यासारखा जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. सुसंस्कृत डोंबिवलीला न शोभणारा हा प्रकार आहे. या सर्व प्रवृत्तीला रोखण्यासाठी लोकांनीच आता रस्त्यावर उतरले पाहिजे. लोकांनी जागृत होऊन मतदान केले तर नक्कीच अशा विखारी प्रवृत्तींना नक्कीच आळा बसण्यास मदत होईल, असे पाटील यांनी सांगितले.
