कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेची मतमोजणी पार पडताच भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने (एकनाथ शिंदे) मनसेच्या काही अंतर्गत त्रृटी ओळखून त्यांना आपल्या कळपात ओढण्याची महत्वपूर्ण कामगिरी झटपट पार पाडली. आता पालिकेत महायुतीची सत्ता असली तरी शिवसेनेचा वरचष्मा राहील असा विचार करून मनसेने मोठ्या आनंदाने जुने वैर विसरून शिवसेना शिंदे गटाचे पालिकेतील संख्या बळ वाढविण्यासाठी शिवसेनेच्या वजनदार नेत्याला आपला हात दिला. आता स्वतंत्र गट म्हणून नोंद नसल्याने मनसेला पालिकेतील गटनेतेपदापासून आणि स्वतंत्र पक्ष कार्यालयापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

पालिकेतील सर्वाेच्च वर्चस्व असलेल्या शिवसेना शिंदे गटा बरोबर आपले गुळपीठ असल्याने आपल्या नगरसेवकांच्या प्रभागात झटपट विकास कामे करून घेणे, आवश्यक निधी पदरात पाडून घेणे आणि शिवसेना शिंदे गटाच्या साहाय्याने पालिकेतील स्थायी समितीसह इतर समित्यांमधील महत्वाची मानाची पदे पदरात पाडून घेऊ, असा विचार मनसेच्या काही स्थानिक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देताना केला. हा पाठिंबा देताना आपणास नंतर कायद्यातील तरतुदींचा अडसर येईल याचा विचार मनसे नेत्यांनी केला नाही. आम्ही शिवसेना शिंदे गटाला पालिकेत संख्याबळासाठी पाठबळ देऊन भाजपला कसे चितपट केले, अशी खुशीतील गाजरे मनसेच्या काही नेते, पदाधिकाऱ्यांनी खाल्ली. आणि या आनंदात शिवसेना शिंदे गटाचे नेतेही सामील झाले.

मनसेची पंचाईत

कोकण विभागीय आयुक्तांकडे मनसेने आपल्या पाच नगरसेवकांची स्वतंत्र गट नोंदणी केली असती तर आता पालिकेत मनसेला स्वतंत्र गट म्हणून मान मिळाला असता. मनसेने कोकण विभागीय आयुक्तांकडे पक्ष नोंदणी करताना कल्याण डोंबिवली शिवशाही आघाडीच्या माध्यमातून आपली गट नोंदणी केली. या शिवशाही आघाडीत शिवसेना शिंदे गटाचे ५३, मनसेचे ५ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच एक नगरसेवक अशी एकूण ५९ नगरसेवकांची गट नोंदणी केली आहे. भाजपने आपल्या ५० नगरसेवकांची भाजप कल्याण डोंबिवली शहर विकास आघाडी म्हणून नोंदणी केली. काँग्रेसचे दोन नगरसेवक, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आठ नगरसेवकांनी स्वतंत्र गट म्हणून नोंदणी केली आहे. ठाकरे गटातील फुटीर तीन नगरसेवकांचा प्रश्न अद्याप अधांतरी आहे.

पालिका प्रशासनाने प्रसिध्द केलेल्या आदेशानुसार पालिकेत केवळ शिवसेना शिंदे गट, भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गट असे चार गटनेते मान्य असतील. यात मनसेचा स्वतंत्र गट म्हणून विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनसेला पालिकेत गटनेते पद नाहीच, पण पालिकेत दालन मिळण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासना बरोबरच्या पालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेने आम्ही स्वतंत्र म्हणून गट नोंदणी केल्याचा दावा केला. मनसेच्या नगरसेवकांना शिवशाही आघाडीतील समावेशामुळे शिवसेनेचा पक्षादेश लागू होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे नेहमीच स्वच्छ, पारदर्शकतेची भूमिका घेणारे मनसे नगरसेवक आता सभागृहात शिवसेना शिंदे गटाच्या भूमिके विरूध्द भूमिका घेऊ शकतील का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

या घडामोडींची चाहूल असल्याने मुंबईतील मनसेचे बडे नेते स्थानिक नेतृत्वावर शिवसेनेबरोबर हातमिळवणी केल्यापासून नाराज असल्याची चर्चा आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने मात्र पालिकेत आम्हाला दालन आणि आमचे स्थान अबाधित आहे, असे सांगितले.