मोबाइल अ‍ॅपमुळे आरोपी गजाआड

पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यांनी दत्ताच्या घरच्यांचे मोबाइल कॉल रेकॉर्ड मागवले.

मोबाइलमधील ट्रकॉलर या अ‍ॅपमुळे काशिमीरा पोलिसांनी एका रखवालदाराच्या हत्येप्रकरणी अकरा महिन्यांपासून हवे असलेले दोन आरोपी गजाआड केले आहेत. नथुराम भालेकर ऊर्फ दत्ता आणि धर्मा ठाकूर अशी दोघांची नावे असून हे दोघेही कचरा गोळा करणारे आहेत.

काशिमीरा भागातल्या एका इमारत बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रकाश वैद्य या रखवालदाराची गेल्या वर्षी २० फेब्रुवारीला अज्ञात इसमांनी दगडाने ठेचून हत्या केली होती. हत्येमागे भुरटे चोर आहेत एवढीच जुजबी माहिती पोलिसांकडे होती. खरे तर दोन आरोपींमधील दत्ता हा याप्रकरणात लगेचच पकडला जाणार होता. परंतु पोलिसांची दिशाभूल करून तो स्वत:ची सुटका करून घेण्यात त्या वेळी सफल झाला. हत्येनंतर दोनच दिवसांनी दहिसर पोलिसांनी एका भुरटय़ा चोरी प्रकरणात दत्ताला अटक केली होती. काशिमीरा पोलिसांना भुरटे चोर हवे असल्याची माहिती दहिसर पोलिसांकडे होती. त्यामुळे त्यांनी दत्ताला काशिमीरा पोलिसांच्या हवाली केले. परंतु रखवालदाराची हत्या एका अपंग असलेल्या कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीने केल्याची खोटी माहिती दत्ताने पोलिसांना दिली त्यामुळे पोलिसांनी दत्ताला त्या वेळी सोडून दिले. अनेक दिवस शोध   घेऊनही कचरा गोळा करणारी अपंग व्यक्ती न मिळाल्याने दत्ता खोटे बोलला असल्याची शंका पोलिसांना आली आणि त्यांनी दत्ताचे घर गाठले. परंतु दत्ता घरातून गायब झालेला होता. पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यांनी दत्ताच्या घरच्यांचे मोबाइल कॉल रेकॉर्ड मागवले. त्यात सर्व जण एका मोबाइल क्रमांकावर सातत्याने संपर्क साधत असल्याचे दिसून आले. हा क्रमांक पोलिसांनी मोबाइलमधल्या ट्रकॉलरमध्ये टाकला असता त्यात कुक अर्थात आचारी असे नाव दिसून आले. दत्ताच्या आधी केलेल्या चौकशीत तो आधी एका कॅटररकडे आचारी म्हणून कामाला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे हा क्रमांक दत्ताचाच असणार याची पोलिसांची खात्री झाली.

मग त्यांनी कॅटरिंगच्या व्यवसायात असणाऱ्याची चौकशी सुरू केली आणि त्यात दत्ताचा ठावठिकाणा समजून आला. दत्ता कांदिवलीमधल्या एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून कामाला लागला होता. पोलिसांनी त्याची हॉटेलमधूनच गठडी वळली आणि त्यानंतर त्याच्या साथीदारालाही अटक केली.

दोघेही कचरा गोळा करता करता भंगार सामानाची चोरी करायचे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील भंगार सामान चोरण्याचा प्रयत्न दोघांनी केला परंतु रखवालदाराने त्यांचे मनसुबे हाणून पाडले. याचाच राग येऊन दत्ता आणि त्याच्या साथीदाराने रखवालदाराची दगडाने हत्या केली अशी कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mobile app help to accused arrested