डोंबिवली – डोंबिवली, कल्याण परिसरात पादचाऱ्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या एका सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या चोरट्यावर मोबाईल चोरीचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वी एका ट्रक चालकाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हंजला खान असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. मागील काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली परिसरात सकाळ, संध्याकाळी फिरण्यासाठी, बाजारपेठेत पायी चाललेल्या पादचाऱ्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून चोरून नेण्याचे प्रकार वाढले होते. दुचाकीवरून एक तरूण हे प्रकार करत असल्याचे नागरिकांनी पोलीस ठाण्यातील दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले होते.
चोरट्याची मोबाईल चोरण्याची पध्दत एकच होती. त्यामुळे एक ठराविक चोरटा हा प्रकार करत असल्याचा पोलिसांना दाट संशय होता. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पादचाऱ्याच्या हातामधील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने काही दिवसापूर्वी हिसकावून पळ काढला होता. या पादचाऱ्याने चोरट्याचा पाठलाग केला. पण सुसाट वेगाने चोरटा पळून गेला होता. पादचाऱ्याने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अशा भुरट्या चोऱ्यांना वेळीच पायबंद घालण्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांचे स्थानिक पोलिसांना आदेश आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोबाईल चोरीची घटना घडल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्या सीसीटीव्ही कॅमेरा चित्रणात दुचाकीवरून आलेला एक इसम पादचाऱ्याच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून जात असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी त्या दुचाकीचा वाहन क्रमांक शोधला. त्या आधारे त्या इसमाची ओळख पटवली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मोबाईल चोरट्याला डोंबिवली परिसरातून अटक केली.
हंजला खान अशी ओळख त्याने दिली. त्याच्यावर मोबाईल चोरीचे एकूण सहा गु्न्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे हंजला खान याने केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. खान याने यापूर्वी किरकोळ वादातून एका ट्रक चालकाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हंजला खान याला अन्य कोणी साथीदार आहे का. याचाही पोलीस तपास करत आहेत. खान याने चोरी केलेले सर्व मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. हे मोबाईल ज्या नागरिकांचे आहेत. ते त्यांना ओळख पटवून दिल्यानंतर परत करण्यात येणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.