डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर भागात ध. ना. चौधरी विद्यालयाच्या पाठी मागील बाजूला एका नवीन बांधकामाच्या ठिकाणी तेथील रखवालदाराने सोमवारी पहाटे तीन वाजता एका चोरट्याला मोबाईल, घड्याळ चोरताना रंगेहाथ पकडले. त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.किशोर मरांडी (२८, रा. डीएनसी शाळेच्या पाठीमागे, सितामाई केणे चाळीचे बाजुला, नवी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी बांधलेला निवारा) असे रखवालदाराचे नाव आहे. युसुफ अस्लम शेख (२४, रा. मस्जिद बंदर, सोमय्या मैदानाच्या बाजुला झोपडपट्टीत, मूळ निवास बंगाल) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा >>> मुंबईतील डाॅक्टरची डोंबिवलीतील स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकांकडून ८५ लाखाची फसवणूक

पोलिसांनी सांगितले, सुनीलनगर मधील ध. ना. चौधरी शाळेच्या पाठीमागील बाजूमध्ये सीतामाई केणे चाळीच्या जवळ नरसिंह शेठ यांचे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आलेले असते. ते चोरीस जाऊ नये म्हणून विकासकाने याठिकाणी कायम स्वरुपी लक्ष ठेवण्यासाठी एक रखवालदार नियुक्त केला आहे. त्याला राहण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी पत्र्याचा निवारा बांधून दिला आहे.रखवालदार झोपला असताना आरोपी युसुफ शेख आणि त्याचे दोन साथीदार सोमवारी पहाटे निवाऱ्यात चोरीसाठी घुसले. त्यांनी तेथे मंचावर ठेवलेले दोन मोबाईल, एक घड्याळ चोरुन नेण्याचा प्रयत्न करत असताना रखवालदाराला जाग आली. त्याने तात्काळ निवाऱ्यात आलेल्या एकाला घट्ट मिठी मारुन पकडून ठेवले. यावेळी दोन जण पळून गेले. रखवालदाराने ओरडा केल्यानंतर रहिवासी जमा झाले. पकडून ठेवलेला आरोपी युसुफ याला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. युसुफ हा मूळचा बंगालचा रहिवासी आहे. तो मुंबईत मस्जिद बंदर भागात राहतो. पोलिसांनी युसुफवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. ‌उपनिरीक्षक एन. जी. काते या प्रकरणाचा तपास करत आहेत.मुंबई परिसरातील भुरटे चोर डोंबिवली, कल्याण परिसरातील बेकायदा चाळी, झोपड्यांमध्ये आश्रयाला येऊन चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढा कल्याण डोंबिवली शहरांमधील गुन्हे वाढले आहेत.