मुंबई, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे आणि राज्यभरात मोठ्यासंख्येने शिष्य, अनुयायी असलेल्या नवनीत्यानंद महाराज(मोडक महाराज) यांचे पुणे बंगळूर महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत मोटार रस्ता दुभाजकावर आढळून झालेल्या अपघातात निधन झाले. श्री नवनीत्यानंद मोडक महाराज उर्फ अरुण सिताराम मोडक( वय ५४ राहणार स्वामी समर्थ मठ कल्याण) कल्याण पश्चिम येथील सदगुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट चे संस्थापक व अध्यक्ष होते. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’ अशा शब्दांमध्ये भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पुणे बंगलोर महामार्गावर साताऱ्यातील सातारा शहरातील अजिंठा चौक परिसरात मोटर दुभाजकावर आढळून हा अपघात झाला. यामध्ये मोटारीच्या समोरील काच फोडून अरुण सिताराम मोडक हे बाहेर फेकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. कल्याण येथील स्वामी समर्थ मठातील अरुण मोडक हे मोटारीने कल्याण हुन कोल्हापूर कडे जात होते. यावेळी गणेश जगदीश नरडूक हे गाडी चालवत होते. पहाटेच्या सुमारास ते अजंठा चौक परिसरात आले. यावेळी चालक नरडूक यांना दुलकी लागल्याने त्यामुळे मोटार महामार्गाच्या दुभाजकावर जाऊन आदळली. अचानक धडक बसल्याने शेजारी बसलेले अरुण मोडक हे समोरच्या काचेतून बाहेर फेकले गेले. महामार्गावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

महाराजांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात ठेवले जाणार आहे. ही बातमी समजताच राज्यभरातील भक्तगण कल्याणच्या दिशेने रवाना झाले आहेत.